एसटीत सवलत हवी ना, मग स्मार्ट कार्ड आहे का? स्मार्ट कार्ड साठी १ मेपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:05 AM2022-03-30T11:05:25+5:302022-03-30T11:06:55+5:30
स्मार्ट कार्डसाठी एक महिन्याची डेडलाईन
पुणे: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकीट दरात सवलत मिळण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. प्रवाशांनी एक मेच्या आत स्मार्ट कार्ड, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. स्मार्ट कार्ड असेल, तरच एसटीत प्रवाशांना सवलत मिळणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ एसटी प्रवासात जवळपास ३२ घटकांना तिकीट दरात सवलत देते. ज्येष्ठ नागरिकांपासून ते दिव्यांग प्रवाशांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के, तर दिव्यांगांना ७० ते ७५ टक्के सवलत दिली जाते. तसेच, अधिस्वीकृती धारक पत्रकार यांना एसटी प्रवास पूर्णपणे मोफत आहे. अशा विविध घटकांना प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, ही सवलत स्मार्ट कार्ड असेल तरच मिळणार आहे.
स्मार्ट कार्डसाठी एक महिन्याची डेडलाईन :
प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळावे, यासाठी एसटी प्रशासनाने १ महिन्याची मुदत वाढवून दिली आहे.१ एप्रिलला ही मुदत संपत होती. ती आता १ मे करण्यात आली आहे.त्यामुळे ज्यांनी अजूनही कार्ड काढलेले नाही.त्यांनी एक महिन्यात कार्ड काढून घ्यावे.
काय कागदपत्रे लागतात :
ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्ड काढायचे असेल, तर वयाचा पुरावा असलेले कागदपत्रे चालतील. तसेच, आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक झालेला असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांकरिता बोनाफाईड सर्टिफिकेट आदी विविध घटकांनुसार कागदपत्रांची आवश्यकता भासते.
पुणे विभागात आतापर्यंत ७४ हजार प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी मागणी केली आहे. पैकी ७० हजारहून अधिक प्रवाशांना कार्ड देण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर रणवरे ,विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे.