शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका घेऊन जाण्यास सवलत; पोलिसांकडून मिळणार पास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 06:47 PM2020-04-17T18:47:24+5:302020-04-17T18:48:03+5:30
निकाल लवकर लागण्याची शक्यता संचार बंदीमुळे या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे शक्य होत नव्हते.
पुणे : इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका शाळा व महाविद्यालयांमधून घरी घेऊन जाण्यासाठी शिक्षकांना संचारबंदी मधून विशेष सवलत देण्यात आली आहे. ऑनलाइन पास मिळवूण शिक्षकांना या उत्तरपत्रिका घरी घेऊन येता येणार आहेत. त्यामुळे इयत्ता दहावी-बारावीचा निकाल लवकर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली.मात्र, यामुळे दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्या. शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्याची सवलत देण्यात आली होती. परंतु, संचार बंदीमुळे या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पुणे विभागीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पोलीस प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार केला. इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना संचारबंदीतून विशेष सवलत मिळावी, असे पत्र पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी पोलिसांना दिले होते.त्यावर पोलीस प्रशासनाने शिक्षकांना संचारबंदीतून सवलत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी डिजिटल पास देण्यात येणार आहे.
बबन दहिफळे म्हणाले, शाळांमधून उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठी तसेच तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटर कडे देण्यासाठी शिक्षकांनी पोलिसांकडून दिला जाणारा डिजिटल पास घ्यावा. त्यासाठी www.punepolice.in या संकेतस्थळावर जाऊन डिजिटल मास मिळण्याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
---------
पुणे विभागात इयत्ता बारावीचे सुमारे अडीच लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुमारे ८० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाले आहेत. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २ लाख ७५ हजार एवढी आहे. या विद्यार्थ्यांच्या ७० ते ८० टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. इतिहास विषय वगळता बहुतांश विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.
-बबन दहिफळे ,सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभाग