आकाशगंगेतील तब्बल ५०० विस्मयकारक स्फोटांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:38+5:302021-06-11T04:08:38+5:30
पुणे : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्रज्ञानी कॅनडियन हायड्रोजन इंटेन्सिटी मॅपिंग एक्सस्पिरिमेन्टच्या सहकार्याने फास्ट रेडिओ बर्स्ट अर्थात ...
पुणे : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्रज्ञानी कॅनडियन हायड्रोजन इंटेन्सिटी मॅपिंग एक्सस्पिरिमेन्टच्या सहकार्याने फास्ट रेडिओ बर्स्ट अर्थात एफआरबी नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्फोटांचा शोध लावला आहे. चाईम दुर्बिणीन कार्यान्वित झाल्यानंतर, भारतीय शास्त्रज्ञांनी एका वर्षात आकाशगंगेतील तब्बल ५०० विस्मयकारक स्फोटांचा शोध घेतला आहे.
एनसीआरएचे प्राध्यापक आणि प्रकल्पाचे सदस्य डॉ. श्रीहर्ष तेंडुलकर, मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थी प्रज्ञा चावला, मोहित भारद्वाज, प्रा. किओशी मासुई आदींचा या संशोधनात सहभाग होता. आत्तापर्यंत जगभरातील रेडिओ खगोल शास्त्रज्ञांनी त्यांच्या दुर्बिनींनी केवळ १४० स्फोटांची दृश्य टिपली आहेत. एफआरबी प्रकारातील महास्फोटांचा एवढ्या मोठ्या संख्येने शोध लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या अकाशगंगेसह विश्वातील इतर आकाशगंगेतील स्फोटांचा या शोधात समावेश आहे.
विश्वाची निर्मिती आणि आजचे अस्तित्व म्हणजे लहान-मोठ्या स्फोटांची मालिकाच आहे. या प्रकारच्या स्फोटांतूनच सूर्यमाला आणि जीवन अस्तित्वात आले. त्यातीलच फास्ट रेडिओ बर्स्ट या रेडिओ स्फोटांची एवढ्या मोठ्या संख्येने नोंद झाली आहे. त्यामुळे विश्वाला समजून घेण्यासाठी एक अमर्याद दालन या शोधामुळे खुले झाले आहे.
----------------------------
श्रीहर्ष तेंडुलकर म्हणाले की, एकाच उपकरणाचा वापर करून आकाशाच्या एका मोठ्या भागाचे २४ तास सातही दिवस निरीक्षण करून आम्ही या संशोधनांतर्गत एफआरबीचे मोठे नमुने गोळा करू शकलो. त्यात शास्त्रज्ञांनी १८ वारंवार फुटणारे एफआरबी स्रोत ओळखले तर उर्वरित एकदाच घडणारे असल्याचे दिसून आले. खगोल शास्त्रातील अभ्यासकांसाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे.
----
शास्त्रज्ञांनी प्रथमत: अशा रेडिओ स्फोटाचा शोध २००७ मध्ये लावला होता. सध्याच्या रेडिओ स्फोटांची निर्मिती कशी झाली; याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वर्तनही विस्मयकारक असल्याचे दिसून येत आहे. या शोधांमुळे रेडिओ स्फोटांचा कटलॉग अधिक समृद्ध झाला आहे.
-----