एड्सग्रस्तांविषयी भेदभाव हा कलंक
By admin | Published: March 12, 2016 01:39 AM2016-03-12T01:39:50+5:302016-03-12T01:39:50+5:30
एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणे आजही कलंक समजले जाते. सुशिक्षित समजानेही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सेवेने सामर्थ्य येते, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे
पुणे : एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणे आजही कलंक समजले जाते. सुशिक्षित समजानेही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सेवेने सामर्थ्य येते, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे. याच विचाराने मी काम करत आहे. आपण सकारात्मक काम करत गेलो, की समाज आपोआप जुळत जातो, अशा भावना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी व्यक्त केल्या.
चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ. द. वि. निकम स्मृती पुरस्कार तिवसा (जि. अमरावती) येथील डॉ. वाडेकर यांना नागपूच्या वनराई फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ. वाडेकर बोलत होते. डॉ. वाडेकर यांच्या पत्नी विभा वाडेकर यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. तसेच कॅन्सर या आजारावर मात करून यशस्वीरीत्या जीवन जगणाऱ्या शैलजा चौधरी यांना इंदुमती रानडे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख, लीलाताई निकम, प्रबोधिनीचे अध्यक्ष अभिनंदन थोरात, उपाध्यक्ष डॉ. दिलीप काकडे, सरचिटणीस संतोष डिंगणकर व्यासपीठावर होते. डॉ. वाडेकर म्हणाले, ‘‘देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करण्यास सुरुवात केली तेव्हा खूप त्रास झाला. ‘सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोललो तेचि घडते’ या तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे काम सुरू ठेवले. एड्सग्रस्तांसंदर्भातील भेदभाव दूर केला तरच हा आजार नष्ट होईल.’’
प्रास्ताविकात अभिनंदन थोरात यांनी संस्थेच्या कार्याविषयी आणि पुरस्काराविषयी माहिती दिली. मंदार थोरात, अश्विनी भुजबळ यांनी स्वागत केले. निबंध स्पर्धांचे परीक्षण करणाऱ्या अश्विनी घाटपांडे, कांचन थोरात, स्वाती थोरात आणि यशश्री नाईक यांचा सत्कार करण्यात आला. चिंतन थोरात यांनी सूत्रसंचालन केले.