जिरायती गावातील सरपंचाशी मुख्यमंत्र्यानी साधला संवाद पाणी, चारा टंचाई विषयी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:01 PM2019-05-13T17:01:51+5:302019-05-13T17:04:10+5:30
बारामती तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
बारामती: बारामती तालुक्यातील जिरायती भागातील सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्स्द्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर काऱ्हाटी, साबळेवाडी, , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणाऱ्या प्रश्न मांडले. यावेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेलजल योजना मंजुर झाली आहे. मात्र वनविभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्स् कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना या प्रश्न लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सुचना केली. तसेच साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी पंधरा दिवसात संपणार आहे. त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे, अशी मागणी केली. तसेच खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काऱ्हाटीचे सरपंच बबन जाधव यांनी ‘चारा छावणी ऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘हा मंत्रालयस्तरावरचा विषय आहे. दोन दिवसात मंत्रालयामध्ये बैठक होईल. त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच काऱ्हाटीचे सरपंच जाधव यांनी ‘१ जुनपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे अशी मागणी केली. दरम्यान, यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
---------------------------