चर्चा तर होणार! मुंबईत चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; पुण्यात सायंकाळी मनसेची तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:36 PM2021-08-06T20:36:26+5:302021-08-06T20:36:56+5:30
चर्चा तर होणारच! मुंबईत सकाळी चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; सायंकाळी मनसेची पुण्यात तातडीची बैठक
पुणे : भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दोन्हीही पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहे. मात्र राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड शुक्रवारी सकाळी मुंबईत घडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा भाजप मनसे युतीचे जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान राज ठाकरे यांनी तातडीने पुण्यात पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली असल्याची माहिती आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली नसती तरच नवल होते. परंतू, ही केवळ सदिच्छा भेट होती असे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगितले असले तरी यामध्ये राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पण भाजप आणि मनसे युतीबाबत असा कोणताही प्रस्ताव सध्यातरी नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज ठाकरेंचा एका महिन्याच्या कालावधीत तिसरा पुणे दौरा...
राज ठाकरे यांनी आगामी काळातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या महिन्याभराच्या कालावधीत राज ठाकरे यांनी आज तिसऱ्यांदा पुणे गाठले आहे. मागील दोन बैठकांत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता.या दौऱ्यात सुद्धा ते ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांचाही त्यात समावेश असणार आहे. पुण्यात सायंकाळी ही बैठक बोलवण्यात आली होती.
...अन् राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, 'मी काय कुंद्रा आहे का?'
राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज क्लिक करत होते, हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. फोटोग्राफर्सकडे पाहून राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व आलं का कान.. नाक? किती वेळा तेच तेच, असं म्हणत 'मी काय कुंद्रा आहे का?', असं मिश्किल भाष्य राज ठाकरे यांनी केलं होतं.