पुणे महापालिका ‘अर्थ’संकल्पाच्या चर्चेत ‘निरर्थक’ गाणी आणि शेरोशायरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 07:37 PM2020-03-05T19:37:38+5:302020-03-05T19:45:03+5:30
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकमेकांना चिमटेही...
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर सोमवारपासून मुख्य सभेमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकमेकांना चिमटेही काढले जात होते. परंतु, अर्थसंकल्पाच्या चर्चेत आर्थिक मुद्यांवर चर्चा होण्याऐवजी निरर्थक संघगीते आणि शेरोशायरीने सभागृहाचा वेळ घेतला.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी अंदाजपत्रकातील मनोगताचा शेवट ‘संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो, भला हो जिसमे देश का, वो काम सब किये चलो’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पद्याने केला आहे. मुख्य सभेत चर्चेदरम्यान, नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेल्या शिवसेनेला उद्देशून ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला ही रहेगा’ हे चित्रपटातील गीत ऐकवले. शिवसेनेच्या बाळासाहेब ओसवाल यांनी एका भारुडाचे विडंबन करीत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. नगरसेविका अॅड. गायत्री खडके यांनीही संघाच्या पद्याच्या ओळी म्हटल्या.
बुधवारच्या चर्चेदरम्यान गटनेत्यांची भाषणे झाली. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनीही चिंतल यांना हिंदी चित्रपटगीताच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘दोस्तो से प्यार किया, दुश्मनोंसे बदला लिया, जो भी किया, हमने शान से किया।’ विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी, ‘बारीश की तरह मेहेरबानी आप किजीये, आप अपनो की और तुपनो की सियासत बंद किजीये’ असे सांगितले.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरीचा आधार घेतला. महाविकास आघाडीवरील टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले ‘मुझे छोडकर अगर वो खुश है, तो शिकायत कैसी, अगर खुश भी ना देख पाऊँ, तो वो ‘युती’ कैसी? प्रशासन नगरसेवकांच्या कामांवर ‘बारीक’ लक्ष ठेवत असल्यावरून ‘इथे प्रत्येकाला माहितीय प्रत्येकाचं गुपित, इथे प्रत्येक जण डागाळलेला, इथं चंद्रसुद्धा शापित’ ही चंद्रशेखर गोखलेंची चारोळीही त्यांनी ऐकवली- सुनावली. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील ‘संबंधां’वरही शिंदे यांनी गोखले यांची ‘नदीकाठचं गवत नदीशी सलगीनं वागायचं, कारण त्याला जगायला नदीचं पाणी लागायचं’ ही चारोळी ऐकविली.
सभागृह नेते धीरज घाटे यांनी शिवसेनेला उद्देशून ‘हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात साथ छोड देंगे, हम दोस्ती करते है, पानी और मछली की तरह, जुदा करना चाहो तो दम तोड देंगे’ हा शेर म्हटला. भाषण संपविताना ‘देश हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सिखे’ हे संघगीत म्हणत देशभक्तीवरून चिमटा काढला.