चऱ्होलीमध्ये बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची चर्चा
By admin | Published: January 6, 2016 12:37 AM2016-01-06T00:37:20+5:302016-01-06T00:37:20+5:30
चऱ्होलीतील चोविसावाडी, दत्तनगर येथील काळी भिंत परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी नजरेस पडल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपरी : चऱ्होलीतील चोविसावाडी, दत्तनगर येथील काळी भिंत परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास बिबट्यासदृश प्राणी नजरेस पडल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोविसावाडी येथील काळी भिंत येथे घरांसह बागायत क्षेत्रदेखील आहे. घरांजवळच शेती आहे. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे येथील शेतात महिला काम करीत होत्या. दरम्यान, काही महिलांना बिबट्यासदृश प्राणी दिसला. त्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर इतर महिलाही त्या ठिकाणी जमा झाल्या. यासह पुरुष मंडळींनीही त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, काही वेळातच तो प्राणी जवळच असलेल्या झुडपांत निघून गेल्याचे तेथील महिलांचे म्हणणे आहे. येथील काही रहिवासी बिबट्या असल्याचे सांगत आहेत, तर काही जणांकडून तो प्राणी वाघ असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांनी पाच-सहा ठिकाणचे ठसे तपासणीसाठी घेतले आहेत. यासह वन विभागालाही कळविले आहे. वन विभागाकडून या परिसरात पिंजरा लावण्यात येणार आहे. तीन दिवसांपूर्वीच देहूरोडजवळील किन्हई येथेदेखील एका वासरावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्यानेच हा हल्ला केल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. यासह आता चऱ्होलीतही बिबट्या दिसला आहे. (प्रतिनिधी)