प्राध्यापकांच्या वेतनावर अधिसभेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:09+5:302021-09-26T04:13:09+5:30
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात ...
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या सक्षमीकरणाबाबत केवळ चर्चा केली जात आहे. प्रत्यक्षात या केंद्राला संचालक नियुक्त करणे किंवा केंद्राच्या जागेवर इमारतींचे बांधकाम करणे, आदी कामे अद्याप झाली नाहीत. त्याला कोण जबाबदार आहे, असा जाब अधिसभेत विचारण्यात आला. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जात असून, कोरोनामुळे काही कामे पूर्ण होऊ शकली नाही, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. वेतन रोस्टर तयार केले जात नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा झालेली रक्कम संस्थेच्या खात्यात वर्ग केली जाते, असाही आरोप अधिसभा सदस्यांनी केला. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे. संबंधित महाविद्यालयांवर करवाई करावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, विद्यापीठात उभारण्यात आलेले क्रीडासंकुल विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मोफत व माफक दरात उपलब्ध करून देण्याची मागणी काही सदस्यांनी केली. त्यावर विद्यापीठाकडून केवळ इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांकडूनच शुल्क आकारले जाणार असल्याचे डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.
----