ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेची चर्चा निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:07+5:302021-09-24T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पेट्रोल, डिझेल यांचे दर वाढल्यानंतर तुम्हालाही दर वाढवून द्यायला हवेत, मात्र याबाबतीत कायदा नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पेट्रोल, डिझेल यांचे दर वाढल्यानंतर तुम्हालाही दर वाढवून द्यायला हवेत, मात्र याबाबतीत कायदा नसल्याने साखर कारखानदारांना विनंती करण्याशिवाय मी काही करू शकत नाही”, अशा शब्दांत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जनशक्ती ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेकडे हतबलता व्यक्त केली.
इंधन दरवाढीनंतरही कारखानदार ऊस वाहतूक दर वाढवत नसल्याने संघटनेने पंधरा दिवसांपूर्वी ट्रॅक्टर बंद आंदोलन केले. यानंतर साखर आयुक्तांसोबत गुरुवारी (दि. २३) बैठक झाली. यावेळी गायकवाड बोलत होते. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे, अर्थ संचालक मंगेश तिटकारे, प्रकाश कोरडे, भाऊ केचे, सुनील देवकाते, सागर तावडे, शंकर डिसले आदी उपस्थित होते. “साखर उद्योगात अन्य सर्वांसाठी कायदा आहे. वाहतूकदारांसाठीही कायदा करायला भाग पाडू. चर्चा निष्फळ झाली तरी आंदोलन सुरूच राहील”, असे खुपसे म्हणाले.