'माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस चर्चा', सुप्रिया सुळेंचे खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:06 AM2024-02-23T11:06:02+5:302024-02-23T11:06:35+5:30
माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता असून मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते
इंदापूर : बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक हा भातुकलीचा खेळ करुन टाकला आहे. माझी लढाई वैयक्तिक कुणाशी ही नाही. राजकीय, वैचारिक लढाई आहे. माझ्या विरोधात उभ्या असणा-या व्यक्तीबरोबर ती म्हणेल त्या वेळेस, त्या जागेवर व कोणत्या ही व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे खुले आव्हान खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि.२२) शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.
संविधानाची अंमलबजावणी जेथे होते ते मंदीर म्हणजे संसद आहे. त्यामुळे तुम्ही बारामतीची निवडणूक हलक्यात घेता, तशी ती हलक्यात घेत नाही. माझ्या विरोधात उभे राहिल हे मला माहिती नाही. त्याचे उत्तर महायुतीच देईल. लोकशाहीत दोन वेगळे विचार मांडण्यात येत आहेत. माझ्या विचारांमध्ये पूर्णतः सुस्पष्टता आहे. मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करते,असे ही त्या म्हणाल्या.
मराठा, धनगर, लिंगायत ,मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या खुप वर्षापासूनच्या मागण्या आहेत. आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन असंवेदनशील आहे. खोट बोल पण रेटून बोल असा प्रकार करत आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकारची आरक्षणाबाबतची जी भूमिका आहे ती अतिशय फसवी व दुर्देवी आहे. या मध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे, असे सुळे म्हणाल्या. दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. तीनशे खासदार,दोनशे आमदार असे पाशवी बहुमत असताना आरक्षणाबाबत ते कसला ही निर्णय घेत नाही. जरांगे-पाटलांसारखा माणूस आंदोलने करतो. त्यावेळी मंत्री त्यांना भेटायला जातात. मात्र प्रश्न सुटत नाही. सरकार जरांगे व मराठी माणसांची फसवणूक करत आहे. जरांगे यांना सतत आंदोलने का करावी लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपमध्ये सध्या इनकमिंगला महत्व आहे. तुम्ही भ्रष्टाचार करा लगेच आम्ही आरोप करणार. दुस-या दिवशी तुमचा पक्षप्रवेश घेणार. चौथ्या दिवशी तुम्हाला एक मोठे पद देणार ही त्यांची सध्याची आदर्श पॉलीसी ठरली आहे. 'भ्रष्टाचारमुक्त भारत', 'न खाऊंगा न खाने दुंगा'चे काय झाले देवालाच ठाऊक अश्या शब्दात सरकारचे वाभाडे काढत त्या म्हणाल्या की, विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोठी आंदोलने उभारणारे प्रकाश जावडेकर, २०१४ मध्ये भाजप सत्तेत यावा यासाठी याच्यासाठी झटणा-या, खुर्च्या, सतरंजा उचलणा-या माधव भंडारींसारख्या कार्यकर्त्यांना काय मिळाले. ते ज्यांच्याशी लढले ते सत्तेच्या पंक्तीत चांदीच्या ताटात जेवत आहेत. भाजपला सत्तेवर आणण्यासाठी पराकाष्ठा करणा-या गोपीनाथ मुंडे कुटुंबाकडे लक्ष द्यायला आत्ता सरकारला वेळ नाही. १०५ आमदार निवडून आणणा-या देवेंद्र फडणवीसांनी होते. ४० आमदारांच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच गडकरी मुंडे देवेंद्र फडणवीस या मराठी माणसांचा द्वेष करते असा घणाघात खा. सुळे यांनी केला.