सणसवाडीत कामगारांना दह्यातून विषबाधा
By admin | Published: March 14, 2016 01:21 AM2016-03-14T01:21:09+5:302016-03-14T01:21:09+5:30
सणसवाडी (ता. शिरूर) येथील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यातील कामगारांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने १५ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यातील कामगारांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने १५ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील अॅटोमोबाईल क्षेत्रातील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यात ५६० कामगार काम करीत आहेत. कारखान्यात श्री एंटरप्रायझेसमार्फत कामगारांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आहे. शनिवारी सकाळच्या पाळीमध्ये कामगारांना दुपारी जेवणामध्ये दही देण्यात आले होते. या दह्यामधून कामगारांना विषबाधा होऊन शनिवारी सायंकाळपासून उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. कामगारांनी रात्री गोळ्या घेतल्या; परंतु आजही उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ७० कामगारांची तपासणी करुन औषधोपचार केला. यातील जास्त बाधित असणाऱ्या १५ कामगारांवर उपचार सुरू आहेत. सकाळपासूनच रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर कामगारांची गर्दी दिसल्यानंतर रुग्णालयात बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. डॉ. विशाल व्यवहारे यांनी सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले.
दरम्यान, कारखान्याचे प्रकल्पप्रमुख दत्ता दास यांनी सांगितले की, ‘कारखान्याने या प्रकारातून खबरदारी घेत सर्व कामगारांची प्राथमिक तपासणी रुग्णालयात करून घेतली आहे. त्यांना प्रथमोपचार म्हणून औषधेही कारखान्यामार्फत दिली आहेत व कारखान्यामार्फत कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही करण्यात येते. भविष्यात कामगारांच्या आरोग्याची अधिक प्रभावीपणे काळजी घेतली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)