द्राक्ष, डाळिंबावर रोगांचे संकट
By Admin | Published: January 15, 2017 05:29 AM2017-01-15T05:29:37+5:302017-01-15T05:29:37+5:30
गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी असून काही पिकांना या थंडीचा फायदा होत आहे, तर काही पिकांना मात्र ही थंडी बाधक ठरणार आहे. शनिवारी (दि. १४)
खोडद : गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी असून काही पिकांना या थंडीचा फायदा होत आहे, तर काही पिकांना मात्र ही थंडी बाधक ठरणार आहे. शनिवारी (दि. १४) सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा असल्यामुळे या वातावरणाचा शेतीमालाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जुन्नर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेतीमालाची प्रत चांगली राहावी, म्हणून शेतकरी कीटकनाशके व बुरशीनाशके मोठ्या प्रमाणात वापरून फवारण्या करण्यात मग्न आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि डाळिंबांची फुलगळ होण्याची भीती आहे.
जुन्नर तालुक्यात सध्या ४ हजार एकर क्षेत्रांत द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षपिक घेतले आहे. जुन्नर तालुक्यातून सुमारे ४ ते ५ हजार टन द्राक्षे निर्यात होतात. द्राक्षांमध्ये ३ हजार एकर क्षेत्रांत जंबो शरद, फ्लेम या जातीची द्राक्षे आहेत. जंबो जातीच्या द्राक्षांना १५० रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळत आहे. जंबोचे एकरी ५ ते ६ टन निर्यातक्षम उत्पादन निघते. फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान निर्यातक्षम द्राक्षांची काढणी होते. निर्यातक्षम द्राक्षांना एकरी ४ लाख रुपये खर्च येतो, म्हणजेच ४० रुपये प्रतिकिलोला उत्पादन खर्च येतो. मात्र उत्पादन कमी प्रमणात निघाल्यास उत्पादनाच्या खर्चात प्रचंड वाढ होते. सध्या काही द्राक्षबागा रंग येण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही द्राक्षबागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत. थंडी कडाक्याची असल्याने रंग येण्याच्या अवस्थेतील द्राक्षांना रंग येण्यास फायदा होत आहे, तर फुगवणीच्या अवस्थेतील द्राक्षांचा थंडीमुळे फुगवणीचा कालावधी लांबणीवर पडून या द्राक्षांची काढणी १५ ते २० दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या घडांना उन्हापासून संरक्षण व्हावे, म्हणून रद्दी पेपर गुंडाळले आहेत. मात्र सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.