वाहनचालकांच्या घाईला दंड वसुलीचा ब्रेक

By admin | Published: April 17, 2017 06:27 AM2017-04-17T06:27:57+5:302017-04-17T06:27:57+5:30

वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांचे नाते उंदीर आणि मांजरीप्रमाणे आहे. गेल्या काही दिवसांत नियमभंग करणारे वाहनचालक आणि ‘सावज’ शोधण्यासाठी

Dishonor recovery penalty | वाहनचालकांच्या घाईला दंड वसुलीचा ब्रेक

वाहनचालकांच्या घाईला दंड वसुलीचा ब्रेक

Next

पुणे : वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांचे नाते उंदीर आणि मांजरीप्रमाणे आहे. गेल्या काही दिवसांत नियमभंग करणारे वाहनचालक आणि ‘सावज’ शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. नुकतेच नगरसेवक अमोल बालवडकर आणि पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांच्यामध्ये असाच वाद उद्भवला होता. मात्र, चालकांची अतिघाई आणि नियमभंग करण्याची सवय, पोलिसांचा उर्मटपणा कधी कमी होणार असा प्रश्न आहे.

नगरसेवक बालवडकर आणि निरीक्षक डामसे यांच्या वादामधून बालवडकरांना अटक झाली. त्यांनी आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, रस्त्यावरची खरेच स्थिती काय आहे याची पाहणी ‘लोकमत’ने रविवारी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर केली. लाल सिग्नल असतानाही वाहतूक पोलिसाची नजर चुकवून सुसाट वेगाने पसार होणारे अतिघाईतील वाहनचालक आहेत. लायसेन्स नसताना दुचाक्या चालविणारे युवक-युवती आहेत. काही ठिकाणी पोलिसाने थांबविल्यावरही वाहन सुरू करून पसार होणारे आहेत. नियम तोडणारा वाहनचालक दिसताच त्याला दंडाच्या रकमेविषयी गंभीरपणे सांगणारा पोलीस काही वेळातच नोटेची बारीक घडी चपळाईने तळहातात लपविताना दिसतो. रविवारी सायंकाळी शहराच्या
वाहतूक व्यवस्थेची ‘लोकमत’ने टिपलेली ही क्षणचित्रे असून, त्यामुळेच वाहतुकीचे चित्र जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौक किंवा खंडुजीबाबा चौक अशा गजबजलेल्या मोठ्या चौकांमध्ये शक्यतो सिग्नलचे नियम पाळले जातात. त्यामानाने लहान रस्ते किंवा मोठ्या चौकांमधून डावीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सिग्नल डावलून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: दुचाकी आणि तीनचाकी अशी छोटी वाहने त्यामध्ये अधिक असतात. या पाहणीचा हा आँखों देखा हाल.
(प्रतिनिधी)


वेळ : ५ वाजून १२ मिनिटे. स्थळ : डेक्कन बसस्थानकाजवळील कोपरा. प्रसंग : भिडे पूल संपल्यानंतर सरळ डेक्कनवर येण्यास बंदी असताना एक बुलेटस्वार नो एंट्रीमधून डबलसीट आला. वाहतूक पोलिसाने त्याला अडविताना नो एंट्री असल्याचे सांगितले. वाहन बंद करुन साळसूदपणे मला नो एंट्रीविषयी माहिती नव्हते, असा सूर बुलेट चालकाने लावला. पोलिसाने लायसेन्स मागितले असता लायसेन्स नसल्याचे सांगितले गेले. इतक्यात पोलिसाला त्याच्या मोबाईलवर फोन आल्याने तो फोनवर बोलण्यात दंग झाला. तरुण बुलेटस्वाराने चपळाईने बुलेटला किक मारली आणि पसार होऊ लागला. त्या वेळी त्याला पकडण्यासाठी काही पावले जात ’का रे ए हरामखोर’असे संतापजनक उ्द्गार पोलिसाने काढले आणि मोबाईलमध्ये मग्न झाला.

वेळ : ५.२० : स्थळ : खंडुजीबाबा चौकातील हाजी मक्केशाह मशिदीसमोर. प्रसंग : संभाजी पुलावरून डावीकडे वळून कर्वे रस्त्यावर जाण्यासाठी नॉन गिअरच्या दुचाकीवरून वेगाने निघालेला स्थानिक अल्पवयीन तरुण. त्याला पोलिसाने अडविल्यावर चुकीची जाणीव झाली. पोलिसाने फक्त त्यालाच ऐकू जाईल अशा आवाजात लायसेन्सची मागणी केली. ते त्याच्याकडे नव्हते. त्याला दंडाची रक्कम सांगितल्यावर तो गांगरला. रस्त्याच्या कडेला बाकावर बसलेल्या खाकी वर्दीतील पोलिसाला भेट अशा अर्थाचे वाहतूक पोलिसाने सांगितल्यावर या मुलाने तिकडे जाऊन काही विनंती केली. त्यावर नकारार्थी मान हलवत खाकी पोलिसाने काही सल्ला दिला. अखेर अल्पवयीन मुलाने वाहतूक पोलिसाशी अर्थपूर्ण चर्चा केली. त्याला जाऊ दिले गेले.


सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटे : स्थळ : हत्ती गणपतीजवळील चौक
प्रसंगी : जोंधळे चौक ते साहित्य परिषदेदरम्यानच्या रस्त्यावर नो एंट्री असताना एक मोटरसायकलस्वार आला. तेथे असलेल्या खाकी वर्दीतील पोलिसाने त्याला अडविले. त्याने आपण जवळच राहत असल्याचे सांगितले. त्यावर खाकी वर्दीतील पोलिसाने त्याला कुठे राहतोस? ते दाखव, असे फर्मावले आणि काही पुटपुटला. त्यावर चिडून या मोटरसायकलस्वाराने पोलिसाला नीट बोला, नीट बोला, असे सुनावले. पोलीस म्हणाला, मी काय बोललो तुला भाऊ? मी फक्त लायसेन्स मागतोय. त्या तरुणाने कोणत्या तरी वजनदार व्यक्तीची ओळख सांगून मोटारसायकलवर बसत ‘आता काय करताय बोला?’ असे आव्हान दिले आणि उलट्या दिशेने निघून गेला. त्यादरम्यान खाकी वर्दीतील पोलिसाने त्याच्या वाहनाचा मोबाईलवर फोटो काढून घेतला होता.

Web Title: Dishonor recovery penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.