गणेशमूर्तींचे चुकीच्या पद्धतीने विसर्जन करणे दुर्दैवी, बारामती ‘बंद’चे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:16 AM2018-10-03T00:16:37+5:302018-10-03T00:17:00+5:30
नगर परिषद प्रशासन चुकीच्या पद्धतीने विसर्जन करत असल्याचे बातम्यांमधून आम्हाला समजले आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याचा आम्हीदेखील निषेधच करतो.
बारामती : नगर परिषद प्रशासन चुकीच्या पद्धतीने विसर्जन करत असल्याचे बातम्यांमधून आम्हाला समजले आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याचा आम्हीदेखील निषेधच करतो. या घटनेशी आमच्या संस्थेचा, पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा संबंध नाही. संस्थेचे नाव विनाकारण गोवले जात आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कृत्य आमच्या संस्थेकडून कधीही झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा दावा एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया च्या वतीने देण्यात आला आहे.
बारामती नगरपरीषदेच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेश मुर्तीं कचरा डेपोच्या खड्डयात विल्हेवाट लावण्यासाठी आणल्याच्या पार्श्वभुमीवर फोरम ने त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणामध्ये फोरमवर देखील गुन्हा दाखल झाल्याने फोरमने व्यक्त केलेल्या भुमिकेला महत्व आले आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा ºहास होऊ नये याकरिता मातीच्या मूर्ती जास्तीत जास्त गणेशभक्तांनी बसवाव्यात या उद्देशाने संस्थेच्या वतीने गेली ३ वर्ष शालेय विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याचे साहित्य आणि प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थी स्वयंप्रेरणेने स्वत:च्या हाताने मूर्ती बनवून आपापल्या घरी स्थापन करतात. जलप्रदूषण होऊ नये या एकाच सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशभक्त नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये स्वेच्छेने गणेश मुर्तीचे विसर्जन करत असतात.
या विसर्जन प्रक्रियेमध्ये आमच्या संस्थेचा कसलाही संबंध नाही, अशी भुमिका फोरम ने घेतली आहे.
बुधवारी बारामती ‘बंद’चे आवाहन
बारामती नगर परिषदेच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेश मूर्ती कचरा डेपोच्या खड्ड्यात विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी बुधवारी (दि. ३) बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषद, फोरमकडे जमा असणाºया मूर्ती विटंबना टाळण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घ्याव्यात, या घटनेचा तपास अधिकारी बदलावा, आदी मागण्या कसबा येथील शिवाजी उद्यानात गणेश मंडळ, गणेशभक्तांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाºयांनी गणेश मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, असे भाजप नेते प्रशांत सातव यांनी सांगितले.