महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:09+5:302021-03-04T04:20:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांवर संस्थेच्या लक्ष्मी रस्त्यावरील मालकीच्या दुकान गाळ्यांची भाडेवसुली आणि करार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांवर संस्थेच्या लक्ष्मी रस्त्यावरील मालकीच्या दुकान गाळ्यांची भाडेवसुली आणि करार संपूनही बेकायदेशीरपणे गाळे ताब्यात ठेवणाऱ्या दुकानदारांवर कोणतीही कारवाई न केल्याबाबत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, विश्वस्त मंडळ बरखास्त करावे आणि संस्थेवर प्रशासक किंवा तात्पुरत्या समितीची नेमणूक करावी, अशी शिफारस करणारा अहवाल धर्मादाय उपायुक्तांनी सह आयुक्तांना पाठविला आहे.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेविरोधात २०१३ मध्ये दिपक रतिलाल मेहता व शंकरभाऊ शेंडगे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तसेच मुख्यालय व विधी आणि न्याय विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक यांना निर्देश दिले होते. त्यानुसार निरीक्षकांनी धर्मादाय कार्यालयाकडे चौकशीचा अहवाल सादर केला. त्यावरील अभिप्रायासह हा अहवाल धर्मादाय उपायुक्तांनी पुढील आवश्यक कार्यवाहीकरिता सह आयुक्त यांच्याकडे पाठविला आहे. संस्थेच्या मालकीचे साधारणपणे १८० गाळे हुजूरपागा शाळेच्या परिसरात तसेच लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्ता परिसरात आहेत. याठिकाणी दुकानभाड्याचे दर हे २०० आणि ३०० रूपये प्रति चौरस फूट असे आहेत. मात्र हे दुकानगाळे नाममात्र १ रूपया चौरस फुटाप्रमाणे दिल्याचे दिसून आले. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ३६ मधील तरतुदीनुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ दुकानगाळा भाड्याने देण्याचा असल्यास धर्मादाय सह आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, सुरूवातीस ११ महिन्यांचा केलेला करार संपल्यानंतरही गाळेधारकांनी दीर्घ दुकानगाळे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले आहेत तर काहींनी दुकानगाळे जादा किमतीला पोटभाड्याने दिले आहेत. परंतु त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. विद्यमान विश्वस्त सत्तेवर येण्यापूर्वी बहुतांश गाळे भाड्याने दिले आहेत. परंतु विद्यमान विश्वस्तांनी २००२, २००९ पासून पदभार स्वीकारल्यानंतर मुदत संपलेल्या आणि बेकायदेशीर ताबा असलेल्या व अल्प भाडे देत असलेल्ता दुकानदारांविरूद्ध कायदेशीर कारवाई करणे व बाजारभावाप्रमाणे भाडे घेणे आवश्यक होते. मात्र १५-१६ गाळेधारकांविरूद्धचे दावे वगळता उर्वरित गाळेधारकांविरूद्ध विद्यमान विश्वस्तांनी कारवाई करणे अपेक्षित असतानाही त्यांनी केली नाही. संस्थेने त्यांची मालमत्ता संरक्षण करण्यासंदर्भात निष्काळजीपणा केला आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
----
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांना संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण करता आलेले नाही. चालू बाजारभावाप्रमाणे संस्थेने गाळे दिले असते तर संस्थेलाच पैसे मिळाले असते. पण त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे आणि संस्थेवर प्रशासक किंवा तात्पुरत्या समितीची नेमणूक करावी, अशी शिफारस करणारा अहवाल धर्मादाय सहआयुक्तांकडे पाठविला आहे.
- नवनाथ जगताप, धर्मादाय उपायुक्त