पुणे महापालिका बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:58+5:302021-03-27T04:11:58+5:30
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात सत्ताधारी आणि प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी ...
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात सत्ताधारी आणि प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अॅड. भय्यासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सत्ताधारी पुणेकरांना न्याय देण्यात कमी पडले असून नागरिकांचा जीव वाचविण्याचे कर्तव्य पार पाडत नसल्याने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. सत्ताधारी व प्रशासन हे आपले कर्तव्य सक्षमपणे पार पाडू शकत नाहीत. त्यांनी कर्तव्य पार पाडण्यात कसूर केला असून कोरोनावर झालेल्या खर्चाची माहिती दडवून ठेवण्यात येत असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
तपासणीसाठी ५०० नागरिक आले तरी केवळ शंभर रुग्णांचीच प्रत्येक केंद्रावर स्वॅब तपासणी केली जात आहे. शहरामध्ये एकूण किती रुग्ण आहेत हे राज्य शासनास कळू नये, याकरिता ही दडवून ठेवत अधिकारांची पायमल्ली करत आहेत. पालिकेने कोरोनाच्या धर्तीवर राबविलेली कायमस्वरूपी डॉक्टर भरती प्रक्रिया १८ महिन्यांनंतरही पूर्ण झालेली नाही. सीसीसी सेंटरवर डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुणे पालिका महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ४५२ प्रमाणे बरखास्त करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.