...म्हणून पुणे महापालिका बरखास्त करा; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची थेट उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 03:58 PM2021-03-26T15:58:44+5:302021-03-26T16:42:28+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले विनंती अर्जाचे पत्र
पुणे : पुणे शहरात कोरोना आजार थैमान घालत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असूनही सत्ताधारी म्हणून भाजपाचे पदाधिकारी कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका बरखास्त करावी,अशी मागणी नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करत आहेत. त्यांनी उपाययोजना न करता केवळ हलगर्जीपणा करून शहरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुले यांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते. सत्ताधारी म्हणून पुणेकरांना न्याय देण्यासही भाजपा असमर्थ ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत राज्य शासनाला महापालिका विसर्जित करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार महापालिकेवर लादण्यात आलेल्या कर्तव्याचे पालन केले नाही. किंवा महापालिका उपाययोजना करण्यात सक्षम नसून दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असेल. तर राज्य शासन महापालिका बरखास्त करू शकते. असे पत्रात नमूद केले आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाला ३ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारी, खासगी रुग्णालयावरीलही ताण वाढत चालला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. महापालिका शहरातील नागरिकांचा जीव वाचवण्याबरोबरच कोरोना रुग्णांची वाढही थांबवू शकत नाहीये. पुणे शहरातील कोरोना नागरिकांवर महापालिकेने किती खर्च केला. ही माहिती दडपून ठेवली जात आहे. स्वब सेंटरवर ५०० रुग्ण आले तरी १०० रुग्णांची तपासणी केली जात आहे.
पुणे महापालिकेने कोरोनाच्या धर्तीवर कायमस्वरूपी डॉक्टरची भरती प्रक्रिया राबवली आहे. पण १८ महिन्याचा कालावधी उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पालिकेच्या सीसीसी सेंटरवर डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे ताबडतोब महापालिका बरखास्त करण्याची विनंती त्यांनी केली आहे.