‘दूधगंगा’चे संचालक मंडळ बरखास्त
By Admin | Published: August 30, 2016 01:56 AM2016-08-30T01:56:54+5:302016-08-30T01:56:54+5:30
दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पुणे जिल्हा दूध संघाचे अधिकारी एम. व्ही. जाधव यांची प्रशासक
इंदापूर : दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. पुणे जिल्हा दूध संघाचे अधिकारी एम. व्ही. जाधव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १८ सप्टेंबरनंतर ते दूधसंघाचा ताबा घेऊ शकतात.
दूधगंगा दूध उत्पादक सहकारी कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. के. पाटील यांनी दूधगंगाच्या कर्मचारी सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जाधव यांच्या नियुक्तीमुळे दूधगंगा दूध संघ पु्न्हा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ताब्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना बसलेला मोठा धक्काच असल्याचे मानले जात आहे.
पाटील म्हणाले, की पुणे जिल्हा संघाचे कर्मचारी, त्यांना देण्यात येणारा पगार, सेवाशर्तींसह तालुका संघ बाजूला काढून राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सन १९९८मध्ये दूधगंगा संघाची स्थापना केली होती. प्रारंभीच्या काळात दूधगंगाचे कामकाज चांगले चालले होते. कालांतराने दूधसंकलनात घट आली, कर्ज वाढले, कामगारांचे पगार होईनासे झाले. संचालक व कामगारांमधील दरी वाढू लागली.
दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे कामगार संघटनेने वेळोवेळी शासनाकडे कामगारांच्या थकीत वेतनाबाबत व दूध संकलन बंद असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या आहेत. सन २०१०-११ ते २०१५ अखेर एकूण ७ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होता. प्रतिदिन दूध संकलन २५०० ते ३००० लिटरवर आले होते. मात्र, संघाने आपले दुग्धव्यवसायाच्या मूळ उदिष्टावर
लक्ष केंद्रित न करता त्याचे रक्षण
न करता दूध संघाच्या शासकीय जागेवर शॉपिंग सेंटर बांधकाम कामकाज हाती घेतले.
संचालक मंडळाने दि. २६/३/२०१३ रोजी सहा नागरी पतसंस्थांकडून ४ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज उचलले आहे. या कर्जाचे व्याज ७ कोटी ८ लाख थकीत आहे.
सन २०१३-१४ मध्ये मंजूर शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्राप्त अनुदान आत्तापर्यंत संघास ४ कोटी ६२ लाख रुपये रकमेचा खर्च निरुपयोगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.