घरपट्टीवाढ सर्वसाधारण सभेतही नामंजूर
By admin | Published: April 26, 2017 04:26 AM2017-04-26T04:26:18+5:302017-04-26T04:26:18+5:30
आयुक्तांनी सन २०१७-१८ साठी अंदाजपत्रकात सुचवलेली मिळकतकरातील १२ टक्के वाढ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही नामंजूर केली.
पुणे : आयुक्तांनी सन २०१७-१८ साठी अंदाजपत्रकात सुचवलेली मिळकतकरातील १२ टक्के वाढ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही नामंजूर केली. स्थायी समितीने याआधीच ही करवाढ फेटाळली आहे. पाणीपट्टीतील १५ टक्के वाढ मात्र कायम आहे. ती पुढची सलग ४ वर्षे दरवर्षी १५ टक्के याप्रमाणे अशी असणार आहे.
स्थायी समितीने फेटाळलेला हा विषय मंगळवारी सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला. त्यात बहुसंख्य, विशेषत: भाजपाच्या नगरसेवकांनी स्थायी समितीने ही करवाढ फेटाळल्याबद्दल स्थायी समितीचे अभिनंदन केले. त्याचबरोबर आपापल्या प्रभागातील पाणी समस्येचा, दुबार घरपट्टीचा पाढाही वाचला. काही नव्या सदस्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी पाणीपट्टीही कमी केल्याबद्दल स्थायीला धन्यवाद दिले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी त्यांना उत्तर दिले.
शिंदे यांच्या भाषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे यांनी हरकत घेतली. त्यावरून त्यांच्यातच वाद सुरू झाला. अभिनंदन कसले करता, २४ तास पाणीपुरवठा योजना कागदावरच असतानाही ही वाढ केली, म्हणून स्थायी समितीचा निषेध करा, असे शिंदे म्हणाले. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसही त्या योजनेच्या मंजुरीत सहभागी आहे, याकडे लक्ष वेधले. त्याचाच राग येऊन बराटे यांनी शिंदे यांनी अभ्यास करावा, असे उत्तर दिले.
विरोधी पक्षनेते तुपे यांनी शिंदे यांचे मुद्दे खोडले. ते म्हणाले. आयुक्तांनी त्या वेळी दरवर्षी ५ टक्के याप्रमाणे सन २०४७ पर्यंत सुमारे पावणेचारशे टक्के वाढ सुचवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने ती पहिल्या वर्षी १२ टक्के व नंतर पुढची सलग ४ वर्षे दरवर्षी १५ टक्के याप्रमाणे एकूण ९७ टक्के केली. मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सदस्यांच्या शंकांचे निराकरण केले.
पृथ्वीराज सुतार, प्रवीण चोरबेले, धीरज घाटे, सायली वांजळे, अविनाश बागवे, राजाभाऊ लायगुडे, अभय खेडेकर, नंदा लोणकर, बाळासाहेब ओसवाल, माधुरी सहस्त्रबुद्धे, अॅड. गफूर पठाण, कालिंदी पुंडे, दिलीप वेडेपाटील, बबनराव चांदेरे, हेमंत रासने, डॉ. सिद्धार्थ धेंडे, जयंत भावे, प्रकाश कदम, वासंती जाधव, राजेंद्र शिळीमकर, अमोल बालवडकर, वसंत मोरे, संजय भोसले आदी सदस्य चर्चेत सहभागी झाले.
(प्रतिनिधी)