संवेदनांची विल्हेवाट...!; ‘कोवळ्या फुलांचा’ उमलण्याआधीच घेतला जातोय बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:09 PM2017-12-04T12:09:21+5:302017-12-04T12:46:08+5:30

अनैतिक संबंध आणि नको असलेल्या गर्भधारणेमधून जन्मलेली अर्भके फेकून देण्याच्या वाढत्या घटनांमुळे संवेदनांचीच विल्हेवाट लागण्यास सुरुवात झाली असून कचऱ्यात सापडणारी ही  ‘कोवळी पानगळ’ थांबविण्याची आवश्यकताही निर्माण झाली आहे. 

Disposal of sensations ...!; 'tender flowers', babe victim reprobate relations of youth | संवेदनांची विल्हेवाट...!; ‘कोवळ्या फुलांचा’ उमलण्याआधीच घेतला जातोय बळी

संवेदनांची विल्हेवाट...!; ‘कोवळ्या फुलांचा’ उमलण्याआधीच घेतला जातोय बळी

Next
ठळक मुद्देचंगळवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तरुणाईच्या हातून घडलेल्या चुकांची शिक्षा कोवळ्या जिवांनापुण्यामध्ये अकरा महिन्यांत सापडली ९ जिवंत आणि ११ मृत अर्भके मृत अर्भकांच्या शरीराचे भटकी जनावरे व पक्षी तोडतात लचके

लक्ष्मण मोरे । 
पुणे : नैतिक-अनैतिकतेच्या पलीकडे गेलेल्या, ‘ग्लोबल’ होत चाललेल्या तरुणाईच्या क्षणिक आकर्षणांमधून जन्म घेणारी कोवळी फुलं उमलण्याआधीच कचरापेटीत किंवा गटारामध्ये फेकून दिली जात आहेत. अनैतिक संबंध आणि नको असलेल्या गर्भधारणेमधून जन्मलेली अर्भके फेकून देण्याच्या वाढत्या घटनांमुळे संवेदनांचीच विल्हेवाट लागण्यास सुरुवात झाली असून कचऱ्यात सापडणारी ही  ‘कोवळी पानगळ’ थांबविण्याची आवश्यकताही निर्माण झाली आहे. 
पूर्वी हिंदी सिनेमांच्या कथानकांमध्ये एखाद्या मंदिराच्या अथवा चर्चच्या पायऱ्यांवर असहाय माता नवजात अर्भके ठेवून जात असल्याचे प्रसंग अनेकदा पाहायला मिळालेले आहेत. वास्तवातही तशीच परिस्थिती अद्यापही कायम असून चंगळवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तरुणाईच्या हातून घडलेल्या चुकांची शिक्षा या कोवळ्या जिवांना भोगवी लागत आहे. 
कधी अनवधानाने घडलेल्या चुकीमधून तर कधी आवेगाच्या भरात घडलेल्या  ‘तशा’ घटनांमधून गर्भधारणा राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पुणे शहर पूर्वीपासून विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शिक्षणासाठी देश-विदेशातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत आहेत. त्यातच, उद्योगाच्या दृष्टीने असलेले पोषक वातावरण आणि आयटी हब म्हणून मिळालेली नवी ओळख यामुळे पुण्यामध्ये विविध राज्यांमधून नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थिरावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 
पुण्यामध्ये अकरा महिन्यांत ९ जिवंत आणि ११ मृत अर्भके सापडली आहेत. या घटना पोलिसांकडे नोंद झालेल्या आहेत. जी अर्भके सापडलीच नाहीत अशांची संख्या किती असेल हा संशोधनाचा विषय आहे. पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यास दर महिन्यात सरासरी २ अर्भके फेकून दिली जात आहेत. कधी ससूनसह खासगी रुग्णालयांच्या गटारात तर कधी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, कधी कालव्याच्या कडेला तर कधी नाल्याच्या पाण्यामध्ये फेकून दिलेली ही संतती बदलत्या समाजमनाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ही मृत अर्भके उचलताना पोलिसांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. मृत अर्भकांच्या शरीराचे भटकी जनावरे व पक्षी लचके तोडतात. 
अनेक कळ्या खुलण्याआधीच खुडल्या जात आहेत. वर्षाला जिवंत अथवा मृत अर्भके सापडण्याचे प्रमाण वाढत असले तरी आरोपी महिला-पुरुषांना पकडण्यात यश येत नाही. गन्हे उघडकीस आणण्याव्यतिरिक्त तपास पुढे सरकलेला नाही. 
अर्भकांना फेकून दिल्याच्या घटनांमध्ये अद्याप तरी कोणाला शिक्षा झाल्याचे उदाहरण अलीकडच्या काळात समोर आलेले नाही. जिवंत सापडलेली अर्भके अनाथालयात अथवा सोफोश सारख्या संस्थेमध्ये दाखल केली जातात. त्यातील जे जगतात-वाचतात त्यांचे संगोपन केले जाते. 

गर्भातही होते कोवळ्या जिवांची हत्या
केवळ अर्भके फेकून देण्याइतपतच या विषयाचे गांभिर्य मर्यादित राहीलेले नसून बेकायदेशीर गर्भपाताद्वारेही अनेक जीव गर्भातच मारुन टाकले जात आहेत. बेकायदा गर्भपातावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई केली जात असली तरी वारंवार दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जात असल्याची उदाहरणेही समोर येत आहेत. 
राज्यामध्ये २०१५ साली बेकायदा गर्भपाताचे सात गुन्हे दाखल झाले होते. जिवंत अर्भके फेकून देण्यामध्ये नांदेडचा सर्वात वरचा क्रमांक असून त्याखालोखाल अहमदनगर, नाशिक, सांगली आणि मुंबई रेल्वे या पोलीस क्षेत्रांचा समावेश आहे.
जिवंत अथवा मृत अर्भक सापडल्यानंतर पोलीस अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करतात. ही अज्ञात माता कायम  ‘अज्ञात’च राहते. तिचा शोध घेण्यात पोलिसांना कधीच यश येत नाही. जिवंत अर्भक सापडल्यास भादंवि कलम ३१७ नुसार आणि मृत अर्भक असल्याच भादंवि कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल केला जातो. या कलमानुसार बारा वर्षांखालील मुलांना बेवारसपणे सोडून देणाºया माता, पिता अथवा पालकत्व घेतलेल्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड अथवा दोन्हींची शिक्षा होऊ शकते. तर, कलम ३१८ नुसार दोषींना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

अर्भकांविषयी घडणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात कलम ३१३ ते ३१८ या कलमान्वये गुन्हे  दाखल केले जातात.
कलम ३१३ - कोणत्याही स्त्रीचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्यास दोषीला आजीवन कारावास अथवा दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेचे प्रावधान आहे. 
कलम ३१४ - गर्भपातादरम्यान स्त्रीचा मृत्यू झाल्यास दोषीला आजन्म कारावास अथवा दहा वर्षांपर्यंतची शिक्षा, दंड अथवा दोन्ही होऊ शकते. 
कलम ३१५ - बाळाचा जन्म रोखणे, त्याला गर्भातच मारून टाकणे अथवा ते जिवंत जन्म घेऊ नये असे कृत्य केल्यास दहा वर्षांपर्यंतची शिक्षा, दंड अथवा दोन्ही.
कलम ३१६ - जन्म न झालेल्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या किंवा गर्भावस्थेतील स्त्रीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याला दहा वर्षांपर्यंतची 
शिक्षा, दंड अथवा दोन्ही.

Web Title: Disposal of sensations ...!; 'tender flowers', babe victim reprobate relations of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे