रेटवडी हद्दीत खड्डा खोदून कचऱ्याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:24+5:302021-07-10T04:08:24+5:30
दावडी : रेटवडी (ता. खेड) येथे ग्रामपंचायतच्या हद्दीत खड्डा घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी ...
दावडी : रेटवडी (ता. खेड) येथे ग्रामपंचायतच्या हद्दीत खड्डा घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. या परिसरात कचरा टाकू नये यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनला निवेदन देऊन कचरा टाकणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
राजगुरुनगर शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर रेटवडी गाव आहे. पूर्व भागात सेझ प्रकल्प झाल्यामुळे सेझ लगत असल्याने रेटवडी गावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या ग्रामपंचायतच्या हद्दीत नागोलदरा या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी हायवा डंपरद्वारे कचरा आणून डोंगराच्या उतरत्या बाजूस टाकून जेसीबीने खड्डा घेऊन कचरा मुरुम व मातीने गाडून टाकला आहे. डंपर पाबळ रस्त्याने मांडवळा मार्गे येऊन चासकमान धरण्याच्या डाव्या कॅनालच्या रस्त्याने रेटवडी गावच्या हद्दीत येत आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मिळाले असल्याचे सरपंच गौरी पवार, उपसरपंच नीलम हिंगे यांनी सांगितले. डोगरांचा उतार असलेल्या बाजुस कचरा गाडल्यामुळे पावसाचे पाणी या ठिकाणी जिरून नैसर्गिक पाण्याचा स्रोत दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिसरात कचरा गाडल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात रेटवडी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.
०९ दावडी
रेटवडी येथे कचरा टाकून तो जेसीबीच्या साह्याने गाडून टाकण्यात आला आहे.