Ganesh Visarjan: जलप्रदूषण टाळण्यासाठी हौदातच विसर्जन करा; पुणे महापालिकेची तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:46 PM2023-09-26T12:46:02+5:302023-09-26T12:46:15+5:30

मुठा नदीकाठच्या एकूण १४ घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने १७ फायरमन सेवक व १११ जीवरक्षक तैनात

Dispose into wells to avoid water pollution; Preparation of Pune Municipal Corporation is complete | Ganesh Visarjan: जलप्रदूषण टाळण्यासाठी हौदातच विसर्जन करा; पुणे महापालिकेची तयारी पूर्ण

Ganesh Visarjan: जलप्रदूषण टाळण्यासाठी हौदातच विसर्जन करा; पुणे महापालिकेची तयारी पूर्ण

googlenewsNext

पुणे: गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील सर्व विसर्जन घाटांवर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांच्या गळती ठिकाणी त्वरित दुरुस्ती कामे करण्याकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

संगम घाट, नेने/आपटे घाट, वृद्धेश्वर घाट/सिद्धेश्वर घाट, ओंकारेश्वर, अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे, बापूघाट (नारायण पेठ), खंडोजी बाबा चौक, विठ्ठल मंदिर (अलका चौक), गरवारे कॉलेजची मागील बाजू, ठोसरपागा घाट, दत्तवाडी घाट, राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर, औंधगाव घाट, चिमा उद्यान येरवडा, बंडगार्डन घाट, वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदीकिनार , पांचाळेश्वर या घाटावर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

टिळक चौकात स्वागत मंडप 

टिळक चौकात (अलका टॉकीज) पुणे महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आला आहे. अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दूरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा. गणेशमूर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनाल, विहिरी, तळे यांपासून दूर उभे करून त्यांच्याजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे. मुख्य विसर्जन मिरवणुकीत काही कारणास्तव आगीचा प्रादुर्भाव झाल्यास ही आग तातडीने विझविण्याच्या उद्देशाने कॉमनवेल्थ इमारत येथील बिनतारी संदेश मदत केंद्रात आवश्यक ते फायर एक्स्टिंग्विशर्स व हाताळण्यास दलाचे सेवक उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

२५५ ठिकाणी निर्माल्य संकलन व्यवस्था

महापालिकेकडून शहरातील २५५ ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ५३ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले जाणार आहेत. तर विविध ठिकाणी १५३ ठिकाणी लोखंडी कंटेनरची व्यवस्था केली आहे. कंटेनर भरल्यानंतर ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

घाटांवर अग्निशमन दलाचे १२८ जीवरक्षक

गणेश विसर्जनाच्या वेळी नदीघाटांवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागानेही सर्वतोपरी तयारी केली आहे. मुठा नदीकाठच्या एकूण १४ घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने १७ फायरमन सेवक व १११ जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक दोन घाटांवर १ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्याकडे लाइफ जॅकेट, लाइफ बॉय असे साहित्य असणार आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गरवारे, संभाजी पूल, लकडी पूल यांना नेकलेस जाळी लावण्यात आली आहे. याशिवाय जागोजागी नदीपात्रात आडवा दोरही बांधण्यात आला आहे. त्यामुळे नदीत बुडणाऱ्याला मदत मिळू शकणार आहे.

पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

विसर्जनासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापनाही केली आहे. या विभागाचे ०२०-२५५०१२६९, २५५०६८००, २५५०६८०१, २५५००८०२ हे दूरध्वनी क्रमांक असून, त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

जलप्रदूषण टाळण्यासाठी हौदातच विसर्जन करा

शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन होईल, या दृष्टीने पालिकेने तयार केलेल्या हौदामध्ये तसेच लोखंडी टाक्यांमध्येच मूर्तीचे विसर्जन करावे. अधिकाधिक नागरिकांनी अशा पद्धतीनेच ‘श्रीं’चे विसर्जन करून यंदाच्या वर्षी नवीन आदर्श घालून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांचीही जय्यत तयारी

पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, औषधोपचार, ग्रुप स्विपींग, कंटेनगर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विद्युत यंत्रणा, प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी, मलवाहिनी यांची गळती झाल्यानंतर ती त्वरित दुरुस्त करण्यासाठी पथक, फिरती स्वच्छतागृहे, सूचना फलक आदी तयारी केली आहे.

Web Title: Dispose into wells to avoid water pollution; Preparation of Pune Municipal Corporation is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.