खरपुडी ट्रस्टी आणि ग्रामस्थांचा वाद; चैत्र पोर्णिमा यात्रा भरली मात्र भाविकांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 03:14 PM2024-04-23T15:14:29+5:302024-04-23T15:15:55+5:30
गेल्या दोन वर्षापासून ट्रस्टी व ग्रामस्थाच्या वादामुळे जवळपास १८ लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहे
राजगुरुनगर: कुलदैवत खरपुडी खुर्द (ता खेड ) येथील (दि २३ ) चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडेरायाची यात्रा भरली मात्र देवस्थान ट्रस्टीचा वाद मिटत नसल्यामुळे सुमारे नऊ लाख रुपये उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून ट्रस्टी व ग्रामस्थाच्या वादामुळे जवळपास १८ लाख रुपयाचे नुकसान झाले असून भाविक नाराजी व्यक्त करत आहे.
खरपुडी येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडोबाची यात्रा भरली होती. प्रति जेजुरी म्हणून हा खंडोबा राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. गेल्या दोन वर्षापासून देवस्थान ट्रस्टमध्ये वाद सुरू आहे. देवस्थानमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष मुदत संपली ही तरीही राजीनामा देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी वेगळी ट्रस्ट व्हावी म्हणून गावतील दोन गटानी धर्मदाय आयुक्त कडे अर्ज केले होते. काही केल्यानेही वाद मिटत नसल्यामुळे धर्मदाय आयुक्ताने भाविकांकडून देणगी पावती स्वरूपात घेऊ नये. मंदिरात दानपेट्या ठेवू नये असा मनाई आदेश दिला आहे. मागील वर्षीही असाच मनाई आदेश होता. त्यावेळी अंदाजे ९ लाखाचे नुकसान झाले होते. यंदा पुन्हा अंदाजे ९ लाख रुपयाचे नुकसान होणार आहे. गावातील ऐकमेकांची जिरावा जिरवीच्या राजकारणात खरपुडीचा खंडोबा देव वेठीस धरला आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. मंगळवारी दि २३ रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त देवाची यात्रा भरली होती मात्र सकाळपासून ट्रस्टी मंडळ व नवीन अर्जदार ट्रस्ट मंडळ कोणीही मंदिरावर फिरकले नाही.वादामुळे भाविकांची मोठी गैरसोय होऊन नाराजी व्यक्त होत आहे.