Pune | खरपुडीत खंडोबा देवस्थान ट्रस्टीवरून वाद, यात्रेनिमित्त लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:35 PM2023-04-06T15:35:31+5:302023-04-06T15:41:10+5:30
सध्या कार्यरत असलेली देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून प्रशासनाची नेमणुक करावी अशी मागणी भाविकांनी व ग्रामस्थांनी केली आहे...
- राजेंद्र मांजरे
राजगुरुनगर (पुणे) : खरपुडी (ता. खेड ) येथे देवस्थान ट्रस्टीत दोन गटातील वादामुळे खंडोबा मंदिराच्या परिसर विकासाला दोन वर्षांपासून खीळ बसली आहे. सध्या कार्यरत असलेली देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून प्रशासनाची नेमणुक करावी अशी मागणी भाविकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
प्रति जेजुरी म्हणून खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबाची ओळख आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान आहे. दरवर्षी माघ पोर्णिमा, चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात.अनेक भाविकांचे कुलदैवत असल्यामुळे येथे नेहमी भाविकांची गर्दी असते. देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला असून मंदिर परिसरात अनेक विकासकामे पूर्णत्वास जात असून काही विकासकामे अपुर्ण आहेत. गेल्या महिन्यातच मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला.
या सोहळ्यामध्ये विनाकारण काही ठिकाणी पैशाचा चुराडा करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून दोन वर्षापासून मोठा वाद सुरु आहे. याबाबत परस्पर विरोधी धर्मदाय आयुक्तकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. या वादाचा फटाका मंदिर विकास कामाला बसत आहे. ट्रस्टी अध्यक्ष हे मनमानी कारभार करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच काही ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट मंडळाला विविध विकासकामे करण्यासाठी मदत करण्याऐवजी अडथळा निर्माण करत असल्याचे सांगितले जाते. गेले दोन वर्ष प्रत्येक यात्रेला दोन्ही गटात वाद झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने तात्पुरता वाद मिटून यात्रा पार पडली होती.
आज ( दि ६ रोजी ) चैत्र पौर्णिमानिमित्त मोठी यात्रा भरली होती. मात्र दोन गटात वाद असल्यामुळे ट्रस्ट मंडळ मंदिरात आले नाही. यात्रेचे कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक नाराजी व्यक्त करत होते. भाविक मंदिराच्या जिर्णोद्धारसाठी देणगी स्वरूपात जी रक्कम देतात. ती गोळा केली नाही. त्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचा नुकसानीचा फटाका ट्रस्टीच्या दोन गटातील वादामुळे बसला असल्याचे ग्रामस्थ व भाविकांनी सांगितले.