मुळशी हादरले! म्हशीला पाणी पाजण्यावरून झाला वाद; गोळीबार करत घेतला एकाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:29 PM2021-03-02T12:29:58+5:302021-03-02T12:32:05+5:30
वाळेण येथे म्हशीला पाणी पाजण्यावरून झालेल्या वादात गोळीबार करत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. .
पौड : शहर आणि ग्रामीण भागातील गुन्हेगारी दिवसागणिक फोफावत चालली आहे. मात्र याचवेळी क्षुल्लक कारणावरून एखाद्याला संपवूनच टाकण्याच्या घटना देखील सर्रास घडत आहे. अशाच एका घटनेने मुळशी तालुका हादरला आहे. वाळेण येथे म्हशीला पाणी पाजण्यावरून झालेल्या वादात गोळीबार करत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , वाळेण येथे सायंकाळी चार वाजता अजय टाघु साठे ( वय ४० ) ही व्यक्ती म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेली होती . तेथे त्यांची अजय व बापुलक्ष्मण जोटी ( वय २४ , टा . डोंगरगाव ) यांच्याबरोबर वादावादी झाली. यावेळी अजयने बापुच्या कानशीलात मारली. याचा राग अनावर झाल्याने बापुने घरातील बंदुकीने अजयच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी झाडली.यात अजय जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी हलविले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड येथील रुग्णालयात आणल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारानंतर आरोपीला पौड पोलिसांनी जेरबंद केले आहे . .
मयत व्यक्ती म्हशींना पाण्यासाठी घेऊन गेला असताना किरकोळ वादातून त्यांची एकाबरोबर भांडण झाले. त्याच रागातून शिकारीसाठी असलेल्या छऱ्याच्या बंदुकीने गोळीबार करण्यात आला. त्यात एकाचा खून झाला आहे. हे कोणतेही गँगवॉर नसल्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले आहे..