संभाजी ब्रिगेडमध्ये फूट, संघटनेचे नाव वापरण्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 08:28 PM2018-03-25T20:28:37+5:302018-03-25T23:04:11+5:30
मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये दोन गट पडले आहेत. याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरु होती. अखेर रविवारी प्रवीण गायकवाड पुन्हा सक्रिय झाल्याने संघटनेचे नाव वापरण्याबाबतचा वाद समोर आला आहे.
मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेड संघटनेत फूट पडली असून संस्थेचे नाव वापरण्यावरून प्रवीण गायकवाड आणि सध्याचे पदाधिकारी यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलेला बघायला मिळाला. पूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय झाले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते संभाजी ब्रिगेडमध्ये पुन्हा सक्रिय होणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. त्यावेळी संघटेनची बैठक घेवून त्याच्या अध्यक्षपदी गायकवाड यांची निवड करण्यात आली. दुसरीकडे सध्याच्या संभाजी ब्रिगेडच्या सदस्यांनी याला आक्षेप घेतला असून त्यांनी संघटनेचे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराच देण्यात आला आहे.
याबाबत गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडचा राजकीय पक्ष काढल्याने कार्यकर्त्यांची ससेहोलपट होत होती अशी प्रतिक्रिया देत यापुढे सामाजिक संघटना म्हणून ब्रिगेड कार्यरत राहील असे स्पष्ट केले. धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या नोंदणीत अध्यक्ष म्हणून अजून माझेच नाव असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. त्यामुळे संघटनेचे नाव वापरण्याचा हक्क असल्याचा दावा त्यांनी केला. गायकवाड यांनी प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून सुधीर भोसले, हिंदूराव हुजरेपाटील, महासचिवपदी सुभाष बोरकर आणि मुख्य समन्वयकपदी शांताराम कुंजीर यांची नवी कार्यकारिणी जाहीर केली. मात्र संभाजी ब्रिगेडने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. गायकवाड यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्याजागी ऍड मनोज आखरे यांची निवड करण्यात आली होती. तसा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे देण्यात आला असून आता गायकवाड यांचा संभाजी ब्रिगेडशी संबंध नसल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी सुपारी घेवून ब्रिगेडमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.