अखेर महापालिकेतले भांडण मिटले :महापौरांची मध्यस्थी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:46 PM2018-06-19T18:46:22+5:302018-06-19T18:46:22+5:30
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे.
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे.
२१ मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असतानाच भिमाले व शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यात भिमाले यांनी शिंदेंना उद्देशून अनेक अशिष्ट शब्द वापरले. त्यावरून शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी भिमाले यांच्या विरोधात पोलिसात फिर्यांद दिली त्यानंतर 25 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला. त्याची दखल घेत भिमाले यांनीही शिंदे यांना वकिलामार्फत 101 कोटी रूपयांचा दावा दाखल करणार असल्याची नोटीस बजावली होती.या गटनेत्यांच्या भांडणाची चर्चा शहरासह राज्यातही रंगली होती. या प्रकारामुळे महापालिकेची प्रतिष्ठा कमी झाल्याचे मतही काही ज्येष्ठ नगरसेवकांनी खासगीत नोंदवले होते. अखेर आज हे भांडण मिटल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला.
आज दुपारी झालेल्या सर्वसाधारणसभेच्या सुरूवातीलाच महापौरांनी सदस्यांनी सभागृहाची तिष्ठा सदस्यांनी कायम ठेवावी असे आवाहन केले. त्याला शिंदे व भिमाले यांनी प्रतिसाद दिला.यावेळी शिंदे म्हणाले की, चुकीची माफी मागायला जास्त धेर्य लागतं, ते आमच्याकडे आहे. भिमाले यांनीही सभेच्या कामकाजातून ते वक्तव्ये काढून टाकावे असे सांगितले आणि संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेले भांडण मिटल्याचे स्पष्ट झाले.