संपत्तीचा वाद; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल; सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:12 AM2024-04-01T10:12:38+5:302024-04-01T10:13:07+5:30
संपत्तीच्या वादातून मामा आणि नातेवाईकांनी आईला त्रास दिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कुुंदा आदिनाथ ढुस (५६, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुंदा यांचा भाऊ संजय ठाणगे (वय ५०, रा. वैष्णवी सदन, साईनाथनगर, वडगाव शेरी), त्यांची पत्नी अनिता (४५), मुलगा ऋषीकेश (२८), मंदा रमेश कुऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदा यांची विवाहित मुलगी अनुपमा सुक्रे (३३, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कुंदा यांना चार मुली असून, त्या विवाहित आहेत. वडिलोपार्जित संपत्तीवरून त्यांचे भावाशी वाद सुरू होते. कुंदा काही दिवसांपूर्वी वाघोली परिसरात राहणाऱ्या विवाहित मुलीकडे आल्या होत्या. मुलीच्या घरी त्यांनी पंख्याला स्कार्फ बांधून आत्महत्या केली. संपत्तीच्या वादातून मामा आणि नातेवाइकांनी आई कुंदा हिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे अनुपमा सुक्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अनुपमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.