संचालकांना अपात्र ठरविण्याची खेळी?
By admin | Published: May 12, 2017 04:41 AM2017-05-12T04:41:37+5:302017-05-12T04:41:37+5:30
मुरूम विक्रीत गैरप्रकार, गाळे लिलाव प्रक्रियेत बेकायदशीरपणा तसेच मनमानी कारभारामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : मुरूम विक्रीत गैरप्रकार, गाळे लिलाव प्रक्रियेत बेकायदशीरपणा तसेच मनमानी कारभारामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावात नमूद केल्याने बाजार समितीच्या गैरकारभार उघडकीस आला आहे़ दरम्यान, हा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये, यासाठी सभापती रघुनाथ लेंडे यांनी दोन संचालकांना अपात्र ठरविण्याची खेळी सुरू केली आहे़. यामुळे अविश्वास ठराव हा प्रतिष्ठेचा झाला आहे़
कृषी उत्पन्न बाजार समितीचे १९ पैकी उपसभापती दिलीप डुंबरे, सुमन बोऱ्हाडे, देवराम मुंढे, निवृत्ती काळे, दीपक आवटे, नासीर मन्यार, संतोष तांबे, रंगनाथ घोलप, योगेश शेटे, आनंद रासकर, हिराबाई चव्हाण, सुरेखा गांजळे, प्रकाश ताजणे या १४ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी सभापती रघुनाथ लेंडे यांच्या विरोधात अविश्वास दाखल केलेला आहे़ तर, अतुल बेनके गटाचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यासह धनेश संचेती, धोंडीभाऊ पिंगट, शिरीश बोऱ्हाडे, संतोष घोगरे हे पाच सदस्य अविश्वास ठरावाच्या विरोधात राहणार आहेत़ दरम्यान, दाखल केलेल्या ठरावात सभापती रघुनाथ लेंडे यांनी नारायणगाव येथील बाजार समितीच्या सर्वे नं़ ९८ (७७६) ३ मध्ये ५७ हजार ब्रास मुरमाचे उत्खनन केले. परंतु, प्रत्यक्षात मार्केट कमिटीकडे २१ हजार ९७८ ब्रासचे उत्खनन केल्याचे दाखविले आहे़ तसेच मुरमाचे प्रतिब्रास दर ३०० ते ४०० रुपये असताना सभापती यांनी १४० रुपये ब्रासप्रमाणे मुरुमाचे पैसे जमा करून मोठा भ्रष्टाचार केला आहे़ जुन्नर येथील बाजार समितीच्या मालकीच्या ९१ गाळ्यांची निविदा प्रक्रिया बेकायदेशीर केल्या असून, निविदा खोडल्याच्या तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत.
दरम्यान, सभापती लेंडे यांनी अविश्वास ठराव नामंजूर व्हावा, यासाठी विविध खेळी सुरू केली आहे़ एका महिला संचालकाचे निवडणुकीच्या कालावधीत कोऱ्या कागदावर सह्या करण्यात आल्या होत्या़ त्याचा वापर करून राजीनामा दाखवण्यात आला असून तो मंजूर दाखवून सादर करण्यात आला आहे़ ज्या सभेत दाखविण्यात आला, त्या सभेचा मीटिंग अजेंडा त्या महिला संचालिकेला पाठविण्यात आला आहे़ दुसऱ्या एका संचालकाने पदाचा गैरवापर करून लाभ घेतला़, असे दाखवून त्यांना अपात्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ दोन सदस्य जरी अपात्र करण्यात आले़ तरीही अविश्वास ठराव मंजूर होऊ शकतो, असे संख्याबळ विरोधकांकडे असल्याने रघुनाथ लेंडे आता काय खेळी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़