आंदोलनात समाजकंटकांकडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:16 AM2018-08-10T01:16:44+5:302018-08-10T01:17:02+5:30
चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला़
पुणे : चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली असून, त्यात ५ ते ६ पोलीस जखमी झाले़ या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे़ शहरात तीन ते चार घटना वगळता बंद शांततेत पार पडल्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले़
आज सकाळी ६ वाजताच शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा शाळा-महाविद्यालये बंद असल्याने बससाठी प्रवासी नव्हते़ शहरात नागरिकांनी स्वत:हून दुकाने, आॅफिसेस बंद ठेवल्याने प्रवासी नसल्याने बस सोडण्यात आल्या नाहीत़ शहरात सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला होता़
शहरातील विविध भागातून आंदोलक डेक्कन जिमखाना येथील संभाजीमहाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत होते़ अनेकांनी त्यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगी मागितली होती़ शहरात मार्केट यार्ड येथे एका बसची हवा सोडण्यात आली तर लक्ष्मी रोडवर एका बसची काच फोडण्यात आली़ काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले़ ते वगळता शहरात बंद शांततेत पार पडल्याचे त्यांनी सांगितले़
>ओळख लपविण्यासाठी तोंडाला बांधले रुमाल
सकल मराठा समाजाकडून पोलिसांना अगोदर निवेदन देऊन त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़ ठरल्याप्रमाणे मुख्य संयोजकांनी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाषण करून आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते़ या वेळी तेथे साधारण ८ ते ९ हजार जण जमले होते़ त्यानंतर जमलेले कार्यकर्त्यांपैकी काहींनी सुरक्षा केबीनच्या काचा व लाइट फोडले़ जमलेला जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता़ पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली़ हा प्रकार करणाºयांचा आंदोलकांशी काहीही संबंध नाही, असे सांगून बोडखे म्हणाले की, या समाजकंटकांपैकी काही जणांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते़ त्यांना कोणी नेता नव्हता़ त्यांच्याकडे झेंडे नव्हते़ या समाजकंटकांचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो मिळाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे़