निसर्ग चक्रीवादळातील बाधित अद्यापही मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:50+5:302021-03-16T04:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली सह अन्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली सह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये हजारो शेतकरी व लोकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या लोकांना शासनाकडून मदत केली खरी, पण ही मदत अर्धवट झाली आहे. आजही जिल्ह्यातील अनेक गावे मदतीपासून वंचित आहेत. यासाठी आणखी १० कोटींची गरज आहे. शासनाने हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली.
जिल्ह्यात जून महिन्या आलेल्या चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेलीसह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल दीड हजारपेक्षा अधिक घरे, गुरांचे गोठे, पाॅलीहाऊस, कांद्याच्या बराखी, नेटशेडचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे या सर्व बाधित लोकांना नुकसानभरपाई देण्यास शासनाकडून उशीर झाला. विरोधी पक्षाने टीका केल्यानंतर तीन-चार महिन्यांनंतर हा निधी उपलब्ध करून दिला. पुणे जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ७७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के बाधित लोकांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणखी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो बाधित लोक मदतीपासून वंचित आहे. यात आदिवासी भागातील लोकांच्या घराची अद्याप ही दुरुस्ती झालेली नाही. यामुळे शासनाने तातडीने मदत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मार्चअखेरला जिल्हा प्रशासनाकडे किती निधी खर्च होणार नाही त्यानुसार शिल्लक निधी शासनाकडून देण्यात येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.