वेतनश्रेणीचे प्रस्ताव रखडल्याने शिक्षकांमध्ये असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:17 AM2018-09-25T01:17:15+5:302018-09-25T01:17:27+5:30
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजुरी आदेशाच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव दाखल होऊन वर्ष-दीड वर्ष झाले असून यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, बारामती, मावळ, शिरूर, हवेली या तालुक्यांचा समावेश आहे.
बारामती : पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव जिल्हा परिषदेत मंजुरी आदेशाच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव दाखल होऊन वर्ष-दीड वर्ष झाले असून यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, बारामती, मावळ, शिरूर, हवेली या तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीचे ५०० प्रस्ताव रखडले असल्याचा अंदाज आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक व पदवीधरपदाच्या पदोन्नती मागील दोन वर्षांपासून रखडलेली आहे. अनेक पदे रिक्त असल्याने गुणवत्तेवर परिणाम होत आहे. मुख्याध्यापकपदांची संख्या मर्यादित असूनदेखील मुख्याध्यापकांचा रोस्टर अद्यापही पूर्ण नसल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव वर्षभरापासून रखडले आहेत. वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्याची मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येतो. शासनाच्या नियमानुसार ज्या शिक्षकांचे काम समाधानकारक आहे अशा शिक्षकांना तत्काळ वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येते. जिल्ह्यातील शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित आहेत. पंचायत समितीमध्ये प्रस्ताव पाठविण्यास उशीर होतो. शिक्षक स्वत:हून प्रस्ताव तयार करण्यास मदत करतात. वर्षभराचा काळ लोटला तरीही वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेली नाही, अशी माहिती जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.