ऑनलाईन ॲपवर शहरी नंबर लागत असल्याने ग्रामीण भागात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:14+5:302021-05-12T04:10:14+5:30
पूर्व हवेलीमधील चार लसीकरण केंद्रांवर स्थानिक नागरिकांना लस मिळणार नसेल, तर वरील चारही लसीकरण केंद्रे ताबडतोब बंद करण्यात यावीत ...
पूर्व हवेलीमधील चार लसीकरण केंद्रांवर स्थानिक नागरिकांना लस मिळणार नसेल, तर वरील चारही लसीकरण केंद्रे ताबडतोब बंद करण्यात यावीत अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन व उपसरपंच संचिता संतोष कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्याकडे केली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत वरील चारही लसीकरण केंद्रांवर स्थानिक नागरिकांना लस उपलब्ध करून न दिल्यास, आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर व सरपंच संतोष कांचन यांनी दिला आहे.
उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाडेबोल्हाई या ग्रामीण भागातील सर्वच लसीकरण केंद्रांवर मागील पाच ते सहा दिवसांपासून १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असल्याने, नागरिकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लसीकरण देणे बंद आहे. याचाच फटका ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे पुढे आले आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू ॲप सुरू होताच, ग्रामीण भागातील नागरिकांना ॲप सुरू झाल्याचे समजण्यापूर्वीच शहरी भागातील नागरिक रजिस्ट्रेशन करून मोकळे होत असल्याने उरुळी कांचन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, वाडेबोल्हाई वाघोलीसह पूर्व हवेलीमधील चारही लसीकरण केंद्रांवर ९८ टक्के बाहेरचे नागरिक लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे गावातील नागरिक लसीकरणापासून वंचित, तर शहरीबाबू मात्र खुशीत अशी अवस्था झाली आहे.
याबाबत बोलताना हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे म्हणाले की, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेली मधील नागरिकांना वर नाव नोंदविण्याची संधीच मिळत नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. हा ॲप केंद्र सरकारचा असल्याने, याबाबत काहीही करता येत नाही. मात्र, नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचवण्यात येणार आहेत.
ॲपमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील
केवळ पूर्व हवेलीमधीलच नव्हे तर ग्रामीण भागातील सर्वच लसीकरण केंद्रांवर शहरी भागातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. लसीकरण केंद्र असलेल्या गावातीलच नागरिकांना लस मिळत नसल्याने, नागरिक संतप्त झालेले आहेत. याबाबतचा पाठपुरावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालू आहे.
आमदार अशोक पवार
--