मृतदेहाची चिरफाड करायला वाघाचं काळीज लागतं भावा; भेटा, ५ हजार शवविच्छेदनं केलेल्या डॉक्टरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:08 AM2022-05-23T09:08:59+5:302022-05-23T09:16:55+5:30
कोणतीही भिती न बाळगता मागील १४ शवविच्छेदनाचे काम...
तेजस टवलारकर
पिंपरी :शवविच्छेदनगृह पाहिले तरी अनेकांना भिती वाटते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे म्हटले तरी अनेक जण भिती पोटी मृतदेहाला हात लावत नाहीत. तसेच शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेहाला घेऊन जाण्यासाठी ही अनेक जण तयार होत नाहीत. परंतु कोणतीही भिती न बाळगता मागील १४ वर्षांपासून डॉ. प्रविण कानडे शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनाचे काम करीत आहेत.
सद्यस्थितीत डॉ. कानडे पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहे. त्यांनी आतापर्यंत विविध शासकीय रूग्णालयात काम केले आहे. तळेगाव येथील कार्यरत असताना पुणे-मुबंई महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या अनेकांचे त्यांनी शवविच्छेदन केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर २०१४ मध्ये कोसळलेल्या दरडीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशच हादरला होता. रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय, याची वाट पाहत बसलेले गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले होते. चिखलात गाडल्या गेल्याने मृतदेहांची दुर्रावस्था झाली होती. माळीणच्या घटनेत मृत्यू झालेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन देखील डॉ. कानडे यांनी केले होते. ही घटना कधीही विसरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
५ हजार मृतदेहांचे केले शवविच्छेदन
डॉ. कानडे यांनी आता पर्यंत जवळपास ५ हजार मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. सद्यस्थितीत ते शवविच्छेदन या विषयावर एम. डी. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी सुरूवातीपासूनच शासकीय रूग्णालयात काम केले आहे.
पहिला अनुभव कसा होता?
एमबीबीएसचे नुकतेच शिक्षण पूर्ण करून डॉ. कानडे सातारा येथील शासकीय रूग्णालयात नोकरीला लागले होते. ही गोष्ट २००८ ची आहे. नदीत वाहून आलेल्या मृतदेहांचे त्यांनी शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदन करण्याची ही त्यांची पहिली वेळ होती. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे इतरांचा सल्ला घेणे शक्य नव्हते. अशा वेळी स्वत: अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. पहिल्यांदा केले शवविच्छेदन कधी विसरू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
शवविच्छेदन शिकले कोठे?
डॉ. कानडे यांनी एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केले आहे. येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शवविच्छेदन कसे करायचे याचे शिक्षण घेतले.
प्रत्येक अववय वेगळा करावा लागतो
शवविच्छेदन करताना अववय शरीरातून काढावे लागतात. ज्या ठिकाणी संशय आला वा काही अववय डोळ्यांनी दिसत नसतील तर अशा वेळी मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते. शरीरातून काढलेल्या अववयांची तपासणी करावी लागले. तपासणी केल्यावर मृत्यू कशामुळे झाला याचे निदान होते.
मृतदेहाला न्याय मिळवून देण्याचे काम करावे लागते. शवविच्छेदन करणे हे डॉक्टर म्हणून कर्तव्य आहे. त्यामुळे भिती वाटत नाही. कठीण प्रसंगाच्या वेळी स्वत: निर्णय घ्यावे लागतात.
-डॉ. प्रविण कानडे