डीसकेंच्या मेहुणीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:07 AM2018-05-29T06:07:57+5:302018-05-29T06:07:57+5:30
डीएसके यांची मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय ६१, रा. धनकवडी, पुणे) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक
पुणे : डीएसके यांची मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय ६१, रा. धनकवडी, पुणे) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून सोमवारी विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुरंदरे या डीएसकेंच्या पत्नी हेंमती कुलकर्णी हिच्यासोबत कंपनीत भागीदार असल्याचे व गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ४५ हजार जणांची एक हजार ८३ कोटींची फसवणूक करण्यात आली असून फसवणुकीचा एकूण आकडा दोन हजार ४३ कोटींपर्यंतचा आहे. डीएसके यांच्या भावाचा जावई केदार वांजपे त्याची पत्नी सई वांजपे, डीएसके समूहाचा सीईओ धनंजय पाचपोर, आर्थिक विभागाचा प्रमुख विनयकुमार बडगंडे यांनाही आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर, डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याने मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पुरंदरे या हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत वेगवेगळ््या कंपनीत कार्यरत होत्या. डी. एस. कुलकर्णी अॅन्ड कंपनीचे सुद्धा सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होते त्यामुळे सॉफ्टवेअरचा पासवर्ड केवळ त्यांच्याकडे आहे. २०१० ते २०१७ यादरम्यान शिरीष कुलकर्णी यांनी स्वीकारलेल्या ठेवीतून एकूण १५४ कोटी वर्ग करण्यात आले. याच काळात डीएसके यांच्या खात्यावरुन एकूण ९०. ९४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत, तर इतर सिस्टर कन्सर्न कंपन्यांना सदर कालावधीत एकूण २४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून त्याबाबत तपास करायचा असल्याने पुरंदरेच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली.