हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
By admin | Published: May 4, 2015 03:18 AM2015-05-04T03:18:49+5:302015-05-04T03:18:49+5:30
एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहायला लावणारा फळांचा राजा अखेर सर्वसामान्य पुणकरांच्या अवाक्यात आला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये मागील आठवड्याच्या
पुणे : एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहायला लावणारा फळांचा राजा अखेर सर्वसामान्य पुणकरांच्या अवाक्यात आला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी पेटीमागे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली. हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असल्याची माहिती व्यापारी युवराज काची यांनी रविवारी दिली.
याबाबत माहिती देताना फळांचे व्यापारी युवराज काची म्हणाले, ‘‘रत्नागिरी हापूसची आवक वाढत आहे. शिवाय ग्राहकांची प्रमुख मागणी असलेला तयार आंबा बऱ्यापैकी उपलब्ध होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये दोन ते अडीच हजार पेट्यांची आवक झाली होती. आता रोजची आवक ५ हजार पेट्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच दरात घसरण झाली.’’
दुसरीकडे कर्नाटक आंब्याची दैनंदिन आवकही ३५ ते ४० हजार पेटी आणि ७ हजार करंडी इतकी होत आहे. यामुळे कर्नाटक हापूसचे दर कमी झाल आहेत. ‘‘कर्नाटक हापूसच्या ३ ते ५ डझन पेटीस ६०० ते १२००, ३ ते ५ डझन पायरीला ५०० ते ८००, अडीच डझनाच्या पायरी करंडीस १५० ते २२०, ३ डझन लालबाग करंडीस १०० ते १५०, तर महाराष्ट्र केसरला प्रति किलो ४० ते ५० रुपये भाव आहे,’’ अशी माहिती कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. या आठवड्यात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम म्हणून कच्चा आंबा लवकर तयार होत आहे. त्यामुळे बाजारात तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.