अनधिकृत होर्डिंगसह राजकीय बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:58+5:302021-09-10T04:14:58+5:30
पुणे : शहरात कुठेही होर्डिंग उभारताना किंवा मोठ-मोठे बॅनर (फ्लेक्स) उभारताना, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक ...
पुणे : शहरात कुठेही होर्डिंग उभारताना किंवा मोठ-मोठे बॅनर (फ्लेक्स) उभारताना, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक असते़ मात्र, याकडे पूर्णत: काणाडोळा केला जात असून, राजकीय वरदहस्तामुळे पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांकडून शहराच्या चौकाचौकांत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंगच्या माध्यमातून सातत्याने अनधिकृत जाहिरातबाजी केली जात आहे़ परंतु, याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हेच बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग शहराच्या विद्रूपीकरणास मोठ्या प्रमाणात खतपाणी घालत आहेत़
महापालिका प्रशासनाकडून अशा अनधिकृत बॅनर, होर्डिंगवर नित्याने कारवाई होत असल्याचा दावा करण्यात आला आहे़ तरीही शहरात जागोजागी या होर्डिंगचे पेव फुटल्याचे दिसतच आहे़ दरम्यान, शहरात १ ते २५ ऑगस्टपर्यंत ५१ होर्डिंग, २ हजार ११३ बोर्ड, १ हजार ६२६ बॅनर्स, १ हजार ५५४ फ्लेक्स, २ हजार ९१४ पोस्टर्स अशा १० हजार ७९८ कारवाया झाल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
------------------
राजकीय बॅनरबाजीची जबाबदारी कोणाची?
महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली़ पण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणारी ही बॅनरबाजी रोखणार कशी, कारवाईला गेले तर दादा, आण्णा, भाऊ यांचे येणारे फोनच प्रशासनाला रोखतात़ त्यामुळे या राजकीय बॅनरबाजीची जबाबदारी कोणी स्वीकारायची हा प्रश्न उभा राहात आहे.
-------------------
...कारवाई थंडावली
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ५ ऑक्टोबर २०१८ रोजी लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून ४ जण ठार झाले, तर १० जण गंभीर जखमी झाले होते़ या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा उचलला़ मात्र गेल्या गेल्या दोन वर्षांपासून ही कारवाई थंडावली असून, सध्या केवळ क्षेत्रीय कार्यालयाकडून झेंडे, बॅनर, फ्लेक्स यावरच कारवाई होताना दिसत आहे.
----------------------------