अवकाळी पावसाचे शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री मदत वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 09:00 PM2020-02-05T21:00:55+5:302020-02-05T21:06:17+5:30
प्रत्यक्ष बँक खात्यांमध्ये जमा झाले नाहीत पैसे
पुणे : जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये झालेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रपती राजवट असताना देखील शासनाने तातडीने निधीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पैसे दिले. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत मिळावी म्हणून महाआघाडी सरकारने देखील त्वरीत निधी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भांत बैठकांवर बैठका घेत वाटपाचे नियोजन केले व स्थानिक पातळीवर तहसीलदारांना निधी वाटपाचे आदेश दिले. हवेली, वेल्हा, पुरंदर व बारामती तालुका वगळात सर्व तहसीलदारांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के वाटप केल्याचा अहवाल देखील तहसीलदारांनी दिला. परंतु आजही हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेत पिके पूर्णपणे उध्वस्त झाली. हाताशी आलेले पिक पावसामुळे वाहून गेले. शेत पिकासोबतच जनावरे, शेत तळी, शेतीचे बांध, घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यात सत्ता स्थापनेचे नाटक सुरु असताना शेतकरी मात्र या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे होरपळून निघत होता. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सरकार स्थापन करत असल्याचा आव आणला जात होता. परंतु शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नव्हती.
याच कालावाधीमध्ये राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आल्यानंतर राज्यपालांनी राज्यासह पुणे जिल्ह्यासाठी तातडीची मदत केली. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यासाठी ३९ कोटी ५५ लाख रुपये तर महाआघाडी सरकारने मदतीचा दुसरा हप्त्यापोटी ८६ कोटी ४४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तहसीलदारांना आपल्या मागणीनुसार निधीचे वाटप केले.तहसिलदारांनी देखील अत्यंत तत्परता दाखवत १८ जानेवारी २०२० अखेरपर्यंत शंभर टक्के निधी वाटप केल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तहसीलदारांनी कागदोपत्री निधी वाटप केल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले नाहीत.
--
निधीचे शंभर टक्के वाटप
जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे दोन टप्प्यात आलेल्या सर्व निधीचे वाटप केले आहे. यामध्ये केवळ वेल्हा तालुक्यासह बारामती आणि पुरंदर तालुक्यात नव्याने काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून, या तालुक्यात वाटप शिल्लक राहिले आहे. परंतु अन्य सर्व तालुक्यांमध्ये शंभर टक्के वाटप झाल्याचा अहवाल तहसीलदारांनी दिला आहे. - डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी
--
दोन दिवसांत बँक खात्यांत पैसे जमा होतील
खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे तब्बल ३५ हजार ३८९ शेतकºयांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करण्यासाठी शासनाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण ९ कोटी ७४ लाख ११ हजार रुपयांचा निधी दिला. निधीचे वाटप केले असून, काही गावांमध्ये अद्याप वाटप शिल्लक असून, दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
- सुचित्रा आमले, खेड तहसीलदार