मुलगी जन्माला आलेल्या शेतकरी कुटुंबाला १० रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:14+5:302021-06-16T04:13:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वृक्षलागवडीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात जनतेचा जास्तीत जास्त सहभाग मिळवून वनांबाबत, तसेच वृक्षारोपणाबद्दल स्थानिक जनतेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वृक्षलागवडीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात जनतेचा जास्तीत जास्त सहभाग मिळवून वनांबाबत, तसेच वृक्षारोपणाबद्दल स्थानिक जनतेत आवड निर्माण व्हावी आणि वृक्षलागवडीतून पर्यावरणाचा समतोल राखला जावा. यासाठी वन विभागाकडून लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेवून नवनवीन योजना तयार करण्यात येतात व या योजना राबविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते.
शासनाच्या वतीने कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे: वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेतरक्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणणे, पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इ. बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे, तसेच मुलीच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून १० रोपे ग्रामपंचायतीमार्फत विनामूल्य दिली जातात. त्यामध्ये ५ रोपे सागाची/ सागवान जडया, २ रोपे आंबा, १ फणस, १ जांभूळ आणि १ चिंच अशी रोपे असतात. भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असतो. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा आहे. वरील योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतात व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाते त्यांच्याचपुरती मर्यादित असून १ मुलगा किंवा १ मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. मागील २ वर्षांत ५६.९०० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजने अंतर्गत ५.६९ लक्ष एवढी वृक्षलागवड झालेली आहे.
या योजनेमध्ये संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊन ती संकलित करून दि. ३० जून पर्यंत संबंधित ग्रामपंचायतींना रोपे उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत १ जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.