जिल्हा बँकेकडून आत्तापर्यंत ९३९ कोटीचे खरीप पीक कर्ज वाटप; उद्दिष्टाच्या ५७ टक्के कर्ज वाटप पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:52 PM2020-06-12T20:52:34+5:302020-06-12T20:52:55+5:30
दरवर्षी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात होते..
पुणे : राज्यात मान्सून दाखल झाला तरी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. परंतु, पुणे जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोरोनामध्ये देखील खरीप पीक कर्ज वाटपामध्ये आघाडी घेतली असून, आत्तापर्यंत तब्बल ९३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेला सन २०२०-२१ वर्षांसाठी १६५३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले असून, यापैकी ५६.८३ टक्के खरीप पीक कर्ज वाटप केले आहे.
दरवर्षी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात होते. परंतु यंदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात कर्ज वाटप सुरू होताना अनेक मर्यादा आल्या. त्या कर्ज वाटप करताना बँकेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी देखील दररोज ठराविकच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे बंधन घालण्यात आले. तसेच गत वर्षी शासनाने कर्ज माफी केली, पण कोरोनामुळे अनेकांना मार्च अखेर पर्यंत कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या बँके खात्यावर थकबाकी असल्याने नव्याने पीक कर्ज मिळण्यास देखील अडचण निर्माण झाली. यामुळे मान्सून हंगाम सुरू झाला तरी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले. परंतु शासनाने सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांना तातडीने शेतक-यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पिक कर्ज वाटपाला गती मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण पीक कर्ज वाटपामध्ये ८० ते ९० टक्के वाटा एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आहे. तर अन्य राष्ट्रीयकृत बँकांमधून १० -२० टक्केच पीक कर्ज वाटप केले जाते. पुणे जिल्हा बँकेला सन 2020-21 खरीप हंगामासाठी नाबार्ड बँकेकडून १६५३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी जिल्हा बँकेने आता पर्यंत 939 कोटी म्हणजे ५६.८३ टक्के खरीप हंगमासाठी पीक कर्ज वाटप केले आहे. गत वर्षी ९५० कोटीचे म्हणजे ६६ टक्के खरीप हंगमासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले होते.
-----
यंदा ९५ टक्क्यांपर्यत पीक कर्ज वाटप
पुणे जिल्हा बँकेने कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन असताना देखील यंदा पीक कर्ज वाटपामध्ये चांगली आघाडी घेतली आहे. आता पर्यंत ६० टक्क्यांपर्यत पिक कर्ज वाटप केले असून, सप्टेंबर अखेर पर्यंत ९५ टक्क्यांपर्यत पिक कर्ज वाटप करण्यात येईल. पुणे जिल्हा बँकेकडून दर वर्षी ९० टक्क्यांच्या पुढे पीक कर्ज वाटप केले जाते. हेच राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ १०-१५ टक्के कर्ज वाटप करण्यात येते.
- रमेश थोरात, अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.