‘लोकमत काव्यऋतू’चे आज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 04:32 AM2017-11-13T04:32:51+5:302017-11-13T04:34:04+5:30
प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल देखील रंगणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल देखील रंगणार आहे.
युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘काव्यऋतू’ या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या सुमारे
२ हजारांहून अधिक कवितांतून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये योगिता पाटील (चोपडा, जळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक अँड. अशोक बनसोडे यांनी तर तृतीय क्रमांक पांडुरंग सुतार (जळगाव) यांनी मिळवला आहे.
याशिवाय रोशनकुमार पिलेवान (पिंपळगाव), प्रा. मीनल येवले, डॉ. संजय कुलकर्णी (उदगीर), चित्रा क्षीरसागर (ताळगाव, गोवा), उमेश घेवरीकर
(शेवगाव) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
या कवितांमधून प्रतिभावंत कवींची निवड करण्यासाठी मान्यवर व अभ्यासू परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ कवी व वातट्रिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव, डॉ. नीलिमा गुंडी यांचा समावेश होता.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर, कवी संदीप खरे, कवी वैभव जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कवींना गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सुरुवातीच्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.
काव्यप्रेमींसाठी पर्वणी
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकित कवींना एका व्यासपीठावर आणून त्यांचे कवीसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह कवी संदीप खरे, वैभव जोशी, भरत दौंडकर, अंकुश आरेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, तुकाराम धांडे, कल्पना दुधाळ आदी गाजलेले कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत. त्यामुळे काव्यप्रेमींसाठी ही खरी काव्यपर्वणी ठरणार आहे.