पुण्यातील निवासी मिळकतींना १५ मेपासून बिले वाटप; सवलतीचा परतावा मिळण्यासाठी अर्ज करा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 03:04 PM2023-05-06T15:04:35+5:302023-05-06T15:05:07+5:30
सर्वांना रद्द केलेल्या सवलतीची ४० टक्क्यांची एकूण रक्कम ४ टप्प्यात पुढील मिळकत कराच्या बिलातून वळती करून देण्यात येणार
पुणे : शहरातील निवासी मिळकतींना करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिल, २०१९ च्या पूर्वीच्या व नंतर बांधण्यात आलेल्या सर्व मिळकतींना १५ मेपासून बिले वाटप सुरू करण्यात येणार असून, ३१ मेपर्यंत ही बिले तयार करून जूनपर्यंत ती वाटप करण्यात येणार आहेत.
४० टक्के सवलतीसह असे होणार बिलांचे वाटप
- १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या मिळकतींची बिले १५ मे नंतर.
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या निवासी व बिगरनिवासी मिळकतींना देखभाल दुरूस्तीकरिता देण्यात येणारी १५ टक्के वजावट रद्द करून शासन निर्णयानुसार ती १० टक्के करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२३ पासून करण्यात येणार असून, अशा सर्व मिळकतींची सन २०२३-२४ करिताची बिले १५ मे पासून वितरित केली जातील.
- २०१९ नंतरच्या मिळकतींना ३१ मेनंतर बिले
शहरात १ एप्रिल २०१९ नंतर नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची कर आकारणी ४० टक्के सवलत न देता करण्यात आली आहे. तसेच १ एप्रिल २०१८ पासून ज्या मिळकतींची ४० टक्के जी.आय.एस.सर्व्हेअंतर्गत रद्द करण्यात आली आहे. अशा सर्व मिळकतींनाही ४० टक्के सवलतीचा लाभ मिळणार असून, त्यांना ४० टक्के सवलतीचा लाभ १ एप्रिल २०२३ नंतर मिळणार आहे. सदर मिळकतींना ३१ मे नंतर मिळकत कराची बिले वाटप होणार आहे.
भरलेली सवलतीचा परतावा मिळण्यासाठी अर्ज करा
ज्या निवासी मिळकतींनी १ एप्रिल २०१८ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत ४० टक्के सवलतीची रक्कमही भरलेली आहे. ही रक्कम परत घेण्यासाठी व ही सवलत पुढेही कायम राहण्यासाठी पीटी ३ अर्ज संपूर्ण पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर,२०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे हे अर्ज जमा करावे लागणार आहे. तसेच नागरिकांना हे अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडेही जमा करता येणार आहेत.
या सर्वांना रद्द केलेल्या सवलतीची ४० टक्क्यांची एकूण रक्कम चार टप्प्यात पुढील मिळकत कराच्या बिलातून वळती करून देण्यात येणार आहे.