'क्रीडा भारती'च्या जिजामॉं पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 01:18 PM2023-04-25T13:18:33+5:302023-04-25T13:18:42+5:30

खेळाडूंना यशापेक्षाही पराभवास जास्त वेळा सामोरे जावे लागते मात्र अशा पराजयातूनच शिकत खेळाडूंची प्रगती होते.

Distribution of Jijam awards of Kreeda Bharti in a grand ceremony | 'क्रीडा भारती'च्या जिजामॉं पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण 

'क्रीडा भारती'च्या जिजामॉं पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण 

googlenewsNext

पुणे: खेळाडूंना यशापेक्षाही पराभवास जास्त वेळा सामोरे जावे लागते मात्र अशा पराजयातूनच शिकत खेळाडूंची प्रगती होते. अशा पराजयाच्या वेळी या खेळाडूंच्या मागे त्यांचे आई वडील खंबीरपणे उभे राहतात त्यामुळे खेळाडूची चांगली प्रगती होते असे ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी सांगितले. प्रत्येक खेळाडूच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा विशेषतः आईचा मोठा वाटा असतो. हे लक्षात घेऊन क्रीडा भारती संस्थेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा गौरव केला जातो. यंदा मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू अभिजीत कुंटे आणि आंतरराष्ट्रीय टेनिसपटू तसेच भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षिका राधिका तुळपुळे कानिटकर यांच्या हस्ते हा समारंभ आयोजित करण्यात आला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सुदृढ भारत उपक्रमाचे कौतुक करीत कुंटे यांनी पुढे सांगितले," गेल्या पाच वर्षांमध्ये सुदृढ भारत उपक्रमामुळे आपल्या देशात खेळाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील क्रीडा संस्कृती वाढण्यास मदत होईल" 

राधिका कानिटकर यांनी क्रीडा भारतीच्या उपक्रमांचे कौतुक करीत सांगितले," सहसा खेळाडूंच्या पालकांचे कौतुक होत नाही. क्रीडाभारती तर्फे खेळाडूंच्या मातांचा सत्कार करण्याचा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्राचा गौरवच आहे." यंदा श्रीमती नेहा जोगळेकर (जिम्नॅस्ट रोमा जोगळेकरच्या मातोश्री), सुनंदा गाढवे (धावपटू स्वाती गाढवे), सोनी मानकर (जलतरणपटू स्वेजल मानकर), राखी राजा (बुद्धिबळपटू हर्षित राजा), आशा काळे (मल्लखांबपटू कृष्णा काळे), आशा बोरा (व्हॉलीबॉलपटू प्रियांका बोरा), शीतल तळेकर (जिम्नॅस्ट श्रद्धा तळेकर), कल्पना बाबर (जलतरणपटू हर्ष बाबर), भाग्यश्री नाईक (ट्रायथलॉनपटू तेजश्री नाईक), नमिता देव (स्केटिंगपटू स्वराली देव) या मातांबरोबरच आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर नीता मेहता व स्केटिंगमध्ये विश्वविक्रम नोंदविणारी खेळाडू देशना नहार यांचाही गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा भारती तर्फे यंदापासून सुरू करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि प्रशिक्षक सुभाषराव कुलकर्णी यांना देण्यात आला. 
 
या समारंभात क्रीडा भारती संस्थेचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी जिजामॉं पुरस्कार सुरू करण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी क्रीडा भारती संस्थेचे अखिल भारतीय कोषाध्यक्ष मिलिंद डांगे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष विजय पुरंदरे हेही उपस्थित होते. ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री दीपक मेहेंदळे हे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक होते. प्रा. शैलेश आपटे यांनी स्वागत केले तर भाऊसाहेब खुणे यांनी आभार मानले. अनुजा दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Distribution of Jijam awards of Kreeda Bharti in a grand ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे