फूड बँकेद्वारे गरजूंना 'प्रसादम' फूड पॅकेट्सचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:24+5:302021-04-19T04:09:24+5:30
धनकवडी : ध्यानगुरू रघुनाथ येमुल गुरुजींच्या संकल्पनेतील अन्नसुरक्षा विमा योजनेअंतर्गत फूड बँकेच्या माध्यमातून दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना 'प्रसादम ...
धनकवडी : ध्यानगुरू रघुनाथ येमुल गुरुजींच्या संकल्पनेतील अन्नसुरक्षा विमा योजनेअंतर्गत फूड बँकेच्या माध्यमातून दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना 'प्रसादम फूड पॅकेट्स' चे वाटप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महापालिकेच्या आवारात करण्यात आले.
येमुल गुरुजींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अन्न व अन्नधान्य वाटपाचा हा ६ वा टप्पा होता. याप्रसंगी सभागृह नेते गणेश बिडकर, उद्योजक दानेश शाह, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उपायुक्त माधव जगताप, अवनी संस्थेच्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे उपस्थित होत्या.
हे अन्नदान दानशूर उद्योजक दानेश शाह व परिवार यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी पाचशे गरजूंना पोळी-भाजी व मसाले भाताचे वाटप करण्यात आले. फूड पॅकेट्स सोबतच जीवनसत्त्वाच्या गोळ्या-औषधे ज्यामध्ये एक महिना पुरेल एवढे व्हिटॅमिन डी ३, व्हिटॅमिन सी, झिंक तसेच कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क, असे किटदेखील देण्यात आले.
याप्रसंगी रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले, कोरोनानंतर अत्यंत हालाखीत जगणा-या दिव्यांगांच्या कुटुंबांना हातभार लागावा. निराधारांची उपासमार होऊ नये, गरीब व गरजू नागरिक रिकाम्या पोटी झोपू नयेत, ‘‘मानवतेवर आलेल्या या संकटाच्या काळात लोकांनी अन्नदानासाठी पुढे यावे.
गरजूंना आणखी फूड पॅकेट्सचे वाटप फिरत्या टेम्पोद्वारे स्वारगेट, भवानी पेठ परिसर व शिवाजीनगर भागात मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रघुनाथ येमुल गुरूजी यांचे विशेष सहकार्य लाभले.