रेशनिंगवर मुदतबाह्य डाळींचे होतेय वितरण: एफडीओकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 01:59 PM2019-12-27T13:59:04+5:302019-12-27T14:03:34+5:30
गव्हाचा दर्जादेखील खराब असल्याचे दुकानदारांचे म्हणणे
पुणे : पाकिटावरील तारीख बदलून डाळी वितरित करण्यापाठोपाठ शिधापत्रिकाधारकांना मुदतबाह्य डाळींच्या पाकिटांचे वितरण केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, काही ठिकाणी डाळींचा दर्जा अत्यंत खराब आहे. गेले काही महिने सातत्याने खराब दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत असल्याचे काही दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काही महिन्यांपासून शहरात शिधापत्रिकाधारकांना खराब धान्याचा पुरवठा होत आहे. तसेच, तूरडाळ व हरभराडाळ दर महिन्याला मिळेलच, असेही नाही. याबाबत ग्राहकांनी दुकानदारांकडे विचारणा केली असता, अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून नियमित पुरवठाच केला जात नसल्याचे उत्तर मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यास ‘आम्हाला जसे धान्य मिळते तसाच धान्याचा पुरवठा केला जातो,’ असे उत्तर मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला आम्हालाच सामोरे जावे लागत असल्याचेही दुकानदारांनी स्पष्ट केले.
याबाबत ग्राहक संरक्षण सिमितीचे शहराध्यक्ष संदीप दारवटकर यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे (एफडीओ) तक्रार नोंदविली आहे. या महिन्यात पर्वती दर्शन येथील एका रास्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या डाळीच्या पाकिटावर ४ एप्रिल २०१९ रोजी डाळ पॅकबंद केल्याचा उल्लेख आहे. तसेच, याच पाकिटावर सहा महिन्यांच्या आत वापर करणे
चांगले, अशा आशयाचा मजकूर दिलेला आहे.
जुलै २०१९मधे वितरित केलेल्या डाळीच्या पाकिटांवर छापलेल्या तारखेवर बदललेली तारीख छापली होती. त्या वेळी २०१८ या सालावर २०१९ सालाचा छाप उमटविण्यात आला होता. दर्जेदार धान्याचा पुरवठा करण्यात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दारवटकर यांनी केली आहे.
.........
दुकानदारांनी दर्जा खराब असल्याचे केले मान्य
कोथरूडमधील एका रास्त धान्य दुकानदारांने डाळींचा दर्जा खराब असल्याचे मान्य केले. तसेच, काही महिन्यांपासून गहूदेखील खराब दर्जाचा येत असल्याचे त्यांनी सांगितले.
.........
खराब दर्जाच्या धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
.....