जिल्ह्यात बेड्स क्षमतेच्या ७० टक्के प्रमाणे रेमडेसिविरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:07+5:302021-05-06T04:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी झाला आहे. बुधवार (दि.५) रोजी पुणे शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ६२७ हाॅस्पिटल्सला त्याच्या एकूण फंक्शनल बेड्सच्या ७० टक्के प्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्सचे वाटप केले. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवसांचे मिळून १२ हजार ५१ रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्सचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तशी रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी वाढत गेली. यात गेल्या पंधरा-वीस दिवसांत तर ही मागणी अनेक पटीने वाढली आणि जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला. अखेर रेमडेसिविर इंजेक्शन्सचे सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी व त्याच्या टीमने अत्यंत काटेकोर नियोजन करून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स वाटप सुरू केले. आता दररोज पाच ते सहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्स उपलब्ध होत असून हा तुटवडा कमी होऊ लागला.
रेमडेसिविर इंजेक्शनसचा पूर्वीचा साठा वाटप करण्यात आल्यामुळे कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकास प्रिस्क्रीप्शनस देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. १६ एप्रिलपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा उपलब्ध साठा दैनंदिन तत्त्वावर सर्व रुग्णालयांना समान तत्त्वावर वाटप करत आहे. जेणेकरून सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांचे रुग्णांना थेट साठा उपलब्ध होईल. पुणे जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात २४ बाय ७ रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखणेचे अनुषंगाने शहरी भागात ६ भरारी पथके व ग्रामीण भागात १२ भरारी पथके तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापना केली आहे. त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिविर उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवणेत येत आहे.
आरोग्य विभागाचे निर्देशानुसार गरजू रुग्णांना या इंजेक्शनचा वापर करावा, असे सर्व रुग्णालयांना निर्देश देण्यात येत आहेत.