अतिवृष्टीबाधितांना राज्यात 458 कोटी रूपयांचे वाटप; ८ लाख ५५ हजार २६६ लाभार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:24 AM2021-11-12T07:24:01+5:302021-11-12T07:24:18+5:30
खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आली. ८ लाख ५५ हजार २६६ शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आपला या योजनेतील असहकार अजून सुरूच ठेवला असून त्यांनी अद्याप एकाही शेतकऱ्याला पैसे दिलेले नाहीत.
खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्याचे काही हजार कोटी रुपये केंद्र, राज्य सरकारने व शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसात यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी ३८ लाख ८० हजार विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे दावे दाखल केले.
अन्य बाधित शेतकऱ्यांनाही लवकर भरपाई
कृषी विभाग व कंपन्यांनी ३८ लाख ८० हजार शेतकऱ्यांसाठी १ हजार ३७३ कोटी १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली आहे. रिलायन्स वगळता अन्य ५ कंपन्यांनी आतापर्यंत साडेआठ लाख अर्जदार शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य बाधित शेतकऱ्यांचे दावेही मंजूर असून नुकसान भरपाईचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
तक्रारीची दखल अद्याप नाहीच
भारतीय कृषी विमा, बजाज अलायन्स, एचडीएफसी, इफ्को टोकियो, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड या ६ कंपन्यांची केंद्राने राज्यासाठी विमा कंपनी म्हणून नियुक्ती केली आहे. रिलायन्स वगळता सर्व कंपन्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या केंद्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कृषी आयुक्तांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीबाबत लेखी तक्रार केली आहे, मात्र त्याची अद्याप दखल घेतलेली नाही.