जिल्ह्यात ४४४ ग्रामपंचायतींने कोरोनाला वेशीवरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:09+5:302021-04-17T04:10:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत शहरी भागातील लोकांचा ग्रामीण भागाकडे येणारा लोढा अद्याप सुरू झाला नसल्याने जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींपैकी आज ही सुमारे ४४४ ग्रामपंचायतींने कोरोना महामारीला आपल्या वेशीवरच रोखून धरले आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला नाही, अशी गावे कोरोना मुक्तच ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. परंतु, ग्रामीण भागात पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील परिस्थिती थोडी बरी म्हणावी लागेल. जिल्ह्यात १४०५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ४४४ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
परंतु, आता पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पहिल्या लाटेत ८००-९०० घरात असलेली रुग्णसंख्या आता ११००-१२०० घरात गेली आहे. परंतु, तरी देखील ग्रामीण भागातील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे.
---
या तालुक्यातील गावांमध्ये एकही कोरोनाचा नाही रुग्ण
आंबेगाव-१९, बारामती-१६, भोर-१०१, दौंड-१२, हवेली -२२, इंदापूर-२७, जुन्नर-११, खेड-६२, मावळ-६२, मुळशी-२४, पुरंदर-२२, शिरूर-१०, वेल्हा-५६, एकूण-४४४.