जिल्हा बँकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 05:56 AM2016-06-12T05:56:06+5:302016-06-12T05:56:06+5:30
येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरक्षारक्षकाला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
राहू : येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरक्षारक्षकाला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार बँक फोडण्याच्या उद्देशाने झाला की सुरक्षारक्षकाच्या वैयक्तिक कारणातून झाला, हा विषय आता तपासात उघड होणार आहे. याबाबत यवत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ही घटना सुरक्षारक्षकांच्या वैयक्तिक कारणावरून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी व्यक्त केला. मात्र, यात बँकेचे कोणतेही नुकसान झाले आहे.
राहू या ठिकाणी सोसायटीच्या इमारतीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा व एटीएम आहे. बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी दिवस व रात्रपाळीसाठी दोन सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. शुक्रवार (दि.१0) रोजी सोमनाथ सकट हे सुरक्षारक्षक कामावर असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चार व्यक्तींनी तोंडाला काळे फडके बांधलेले होते. त्यांनी सकट यास बेदम मारहाण केली, त्यानंतर दत्त मंदिर ट्रस्टच्या जागेमध्ये नेऊन तेथेदेखील मारहाण केली असल्याचे सकट यांनी सांगितले. सकट यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
चौकशीनंतर घटनेमागचे कारण कळेल...
याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी टी. एल. थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की बँकेची तोडफोड झाली नसून, परिणामी नुकसान झालेले नाही. सुरक्षारक्षकाला झालेली मारहाण ही बाब पोलिसांच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल.